वारणावती : शिराळा पश्चिम भागात गेल्या दाेन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे चांदोली धरणात २५.१४ टीएमसी पाणी साठा झाला आहे. धरण ७३.७ टक्के भरले आहे.
शिराळा पश्चिम विभागातील चांदोली धरण परिसरात दमदार पावसाची आवश्यकता होती. पावसाचे आगार असणाऱ्या या भागातच यंदा म्हणावा असा पाऊस नव्हता. त्यामुळे माळामुरडाची भात, ऊस पिके कोमेजून जाण्याच्या मार्गावर होती; पण मंगळवारी सकाळपासून दमदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे रोपलागणीची कामे सुरू आहेत. भात भांगलणीची कामे सुरू झाली आहेत.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक ८ हजार ६९१ क्युसेकने होत आहे. धरणातील पाणीसाठा वाढत आहे. धरणातून १ हजार ११० क्युसेक विसर्ग वारणा नदीच्या पात्रात सुरू आहे. सोमवारी सकाळी आठ ते मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत २७ मिलिमीटर पावसासह एकूण ७६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.