शिराळा (सांगली) : शिराळा तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी अद्याप वारणा नदीचेपाणी पात्राबाहेर आहे. चांदोली धरण ७९.१५ टक्के भरले असून १२ हजार ३९८ क्यूसेकने आवक तर ८९७ क्यूसेकने वीजनिर्मिती केंद्रातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आज, बुधवारी कोणत्याही क्षणी धरणातूनपाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.मंगळवारी पावसाचा जोर कमी होता. कोकरूड-रेठरे बंधारा अद्याप पाण्याखाली आहे. त्यामुळे येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मांगले-सावर्डे बंधारा खुला झाला आहे. सागाव येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. चांदोली धरण तसेच पाणलोट क्षेत्रातील निवळे, पाथरपुंज, धनगरवाडा येथे अतिवृष्टी झाली आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर आहे. सागाव, पुनवत, मांगले, आरळा आदी ठिकाणी गावापासून अर्धा किलोमीटरवर ते आले आहे. चांदोली धरणात एकूण २७.२३ टीएमसी (७९.१५ टक्के)तर उपयुक्त २०.२३ (७३.९४ टक्के) पाणीसाठा झाला आहे.कोकरूड-रेठरे बंधाऱ्यावर १० ते १२ फूट पाणी आहे, तर शिराळा शहरासह आसपासच्या गावांना पाणीपुरवठा करणारे मोरणा धरण ८० टक्के भरले आहे. गिरजवडे प्रकल्प टक्के, करमजाई तलाव भरून सांडव्यातून पाणी बाहेर पडल्याने मोरणा नदीच्या पात्राची पाणीपातळी वाढली आहे. शिराळा व कोकरूड पोलीस ठाण्यांमार्फत नदीकाठच्या गावांमध्ये बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
गेल्या चोवीस तासातील व कंसात एकूण पावसाची नोंद (मिलिमीटरमध्ये)पाथरपुंज १८३ (२०९८)निवळे ४० (२१७३)धनगरवाडा ६८ (१२४६)चांदोली ५७ (९२९)कोकरूड ३७.५० (५०६.२०)शिराळा १७.८० (२७०.२०)शिरशी १७.८० (३१९.७०)मांगले १७.८० (२८९.३०)सागाव २०.५० (२७०.१०)चरण ३७.८० (५८७.००)