गंगाराम पाटील ।
वारणावती : चांदोली धरणाच्या मुख्य भिंतीवरील पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने धरण परिसर दीड वर्षापासून अंधारात आहे. कोणी अधिकारी फिरकत नाहीत. त्यामुळे धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे.शिराळा तालुक्यातील चांदोली धरण हे महाराष्ट्रातील मातीचे दुसऱ्या क्रमांकाचे धरण आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणारे ३४.४० टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणाºया धरणाच्या पाणलोट क्षेत्राभोवती ३१७.६७ चौरस किलोमीटरचे चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे.
चांदोली धरणाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने धरणाची मुख्य भिंत, सांडवा, वीजनिर्मिती केंद्र परिसर संवेदनशील आहे. धरणाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आलेले सहाही सीसीटीव्ही कॅमेरे, पथदिवे गेल्या दीड वर्षापासून बंद आहेत. त्यामुळे धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चांदोली धरणाच्या पायथ्याशी २० मेगावॅट क्षमतेची दोन विद्युत निर्मिती केंद्रे असूनही धरण परिसर अंधारात आहे.
धरणाच्या भिंतीजवळ बांधण्यात आलेल्या नवीन पोलीस चौकीकडे जाणाºया मार्गाचीही दुरवस्था झाली आहे. धरण बांधकामावेळी हे रस्ते तयार करण्यात आले होते. तेव्हापासून आजपर्यंत हे रस्ते दुरुस्त करण्यात आलेले नाहीत. अंधारामुळे चांदोली अभयारण्यातून बाहेर पडलेल्या हिंस्त्र प्राण्यांचा सामना करत कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावावे लागते. येथे कॅमेरे, पथदिवे सुरू करण्याची गरज आहे.
धरणाच्या सुरक्षिततेसाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या दोन नवीन चौक्यांचे कामही निकृष्ट दर्जाचे झाले आहे. तेथे पाणी, वीज अशा मूलभूत सोयीही नाहीत. सभोवताली डोंगरदºया, घनदाट जंगल, खाली धरणाचे पाणी, हिंस्र प्राण्यांची भीती अशा धोकादायक स्थितीत पोलिसांना धरणाची सुरक्षा करावी लागते.