वारणावती/सांगली : चांदोलीत पावसाचा जोर कमी झाला असला तरीही धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून ४ हजार ५७३ क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरूच आहे. धरणात आज, बुधवारी ३४.२६ टीएमसी पाणीसाठा झाला.सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या ३६७.१७ चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्रातून चांदोली धरणात पाण्याची आवक होत असते. ३४.४० टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणारे धरण दरवर्षी पूर्ण क्षमतेने भरते. गतवर्षी २१ सप्टेंबरला पूर्ण क्षमतेने भरले होते.यंदाही पावसाचे प्रमाण कमी अधिक असले तरीही आठ दिवस अगोदरच धरण पूर्ण क्षमतेने भरले. पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणातून विसर्ग सुरू ठेवावा लागतो. त्यानुसार मंगळवारी जलविद्युत केंद्राकडून १५७३ क्युसेक व वक्राकार दरवाजातून ३ हजार क्युसेक असा एकूण ४ हजार ५७३ क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू केला आहे.चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी सकाळी आठ ते बुधवार सकाळी आठपर्यंत चोवीस तासांत ३७ मिलीमीटर व बुधवारी चारपर्यंत केवळ ७ मिलीमीटर अशा एकूण २६२२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रातून २९१६ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणीपातळी ६२६.७५ मीटर असून पाणीसाठा ३४.२६ टीएमसी आहे. त्याची टक्केवारी ९९.५८ अशी आहे. बुधवारी दिवसभर ऊन-पावसाचा खेळ सुरू होता.
चांदोली धरण पूर्ण क्षमतेने भरले, ४५७३ क्युसेक विसर्ग सुरू
By श्रीनिवास नागे | Published: September 14, 2022 5:52 PM