विकास शहाशिराळा : चांदोली धरणात गतवर्षीच्या तुलनेत यंदा २.०४ टीएमसी जास्त पाणीसाठा आहे. यामुळे यंदा वारणा नदीकाठ तसेच डावा कालवा व वाकुर्डे योजनेवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सुटला आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या या चांदोली धरणात २५.४९ टीएमसी पाणी शिल्लक आहे.धरणात गतवर्षी या दिवसात २३.४५ टीएमसी पाणी शिल्लक होते. तर या वर्षी २५.४९ टीएमसी पाणी शिल्लक आहे. गतवर्षी धरणातून विसर्ग एकूण १५५४ क्युसेक्स होता. यंदा तो १११५ आहे. त्यामध्ये वाकुर्डे उपसा सिंचन योजनेसाठी ३०० क्युसेक्स पाणी वारणा डाव्या कालव्यामार्फत सोडण्यात आले आहे. वारणा नदीमध्ये ८१५ क्युसेक्स पाणी वीजनिर्मितीच्या केंद्राद्वारे पाणी सोडण्यात येत आहे.चांदोली धरण हे ३४.४० टीएमसी क्षमतेचे असून धरणाचा मृतसाठा हा ७.८८ टीएमसी आहे. तर एकूण उपयुक्त साठा हा २६.५२ टीएमसी आहे. धरणामध्ये उपयुक्त साठा हा १७.६१ टीएमसी असल्याने वारणा काठच्या तसेच वाकुर्डे सिंचन योजने अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांची तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली आहे. शिराळा, वाळवा, कऱ्हाड तालुक्यासाठी वाकुर्डे योजना वरदायिनी ठरत आहे.
Sangli News: गतवर्षाच्या तुलनेत चांदोलीत जादा पाणीसाठा, शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 6:39 PM