अनिल पाटील
सरुड : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले व ३४ . ४० टी.एम . सी . पाणीसाठवण क्षमता असलेले चांदोली ( वारणा ) धरण अखेर सोमवारी शंभर टक्के भरले आहे . कमी पर्जन्यमानामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा हे धरण उशीरा भरले आहे . हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील वारणा नदीकाठच्या शेतकरी वर्गातुन समाधान व्यक्त होत आहे .
गेल्या एक महिन्यापासुन पावसाने हुलकावणी दिल्याने या धरणातील पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला होता . सोमवारी सकाळपासुन या धरण क्षेत्रात पावसाचा जोर होता . सोमवारी सायंकाळी ४ वा . पर्यंत धरण क्षेत्रात १४ मि. मी . पावसाची नोंद झाली आहे . आजअखेर धरण क्षेत्रात १६३४ मि. मी . एवढा पाऊस झाला आहे . सध्या धरणात ११०२ क्युसेक पाण्याची आवक होत आहे .
धरणात पाण्याची आवक वाढल्याने या धरणातील पाणी साठ्यात वाढ होऊन सोमवारी सायंकाळी हे धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे . धरण क्षेत्रात पाऊस सुरु असल्याने धरणाच्या वीज निर्मिती गृहातुन ४५० क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरु करण्यात आला असल्याची माहीती वारणा पाटबंधारे विभागाच्यावतीने देण्यात आली आहे .