विकास शहाशिराळा : परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने चांदोली धरण १०० टक्के भरले आहे. गेली दोन दिवस अतिवृष्टी झाल्याने आज शुक्रवारी सकाळी दहा वाजता धरणाचे वक्राकार दरवाजे उघडण्यात आले. वीजनिर्मिती केंद्रातून १३८० व दरवाज्यातून १२०० असा एकूण २५८० क्यूसेकने विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे चांदोली पाटबंधारेचे शाखाधिकारी गोरख पाटील यांनी सांगितले.जुलै, ऑगस्ट महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र या गेल्या काही दिवसात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे दि.९ सप्टेंबर रोजी धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले होते. बुधवार दि.१८ रोजी दोन्ही वीजनिर्मिती केंद्र बंद करण्यात आला होते. विसर्ग बंद केल्याने दि.२५ रोजी सकाळी सात वाजता धरण शंभर टक्के भरले आहे. मात्र गेली दोन दिवस पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने दोन्ही वीजनिर्मिती केंद्र सुरू केले आहेत. तसेच आज शुक्रवारी सकाळी दहा वाजता वक्राकार दरवाजे उघडण्यात आले आहेत. ५ सप्टेंबर रोजी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली होती यामुळे दोन वक्राकार दरवाजे उघडण्यात आले होते.दि.१८ रोजी सकाळी एक तर दुपारी दोन वाजता दुसरे वीजनिर्मिती केंद्र बंद करण्यात आले होते. त्यामुळे पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद झाला होता. आज वीजनिर्मिती केंद्रातून १३८० व दरवाज्यातून १२०० असा एकूण २५८० क्यूसेक ने विसर्ग सुरू झाला आहे.चांदोली धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने वरिष्ठ कार्यालयाची परवानगी मिळताच वीजनिर्मिती केंद्र सुरू करण्यात आले आहे. पाथरपुंज येथे आज सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी ची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात धरण क्षेत्रातील पाथरपुंज येथे ९०, निवळे ४८, धनगरवाडा ३७, चांदोली ३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. चांदोली धरणात एकूण ३४.४० टीएमसी म्हणजेच १०० टक्के साठा आहे. उपयुक्त २७.५२ टीएमसी साठा आहे.चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पडलेला पाऊस कंसात एकूण पाऊस मिमी मध्ये
- पाथरपुंज येथे - ९० (७८४८)
- निवळे - ४८ (६३१४)
- धनगरवाडा - ३७ (३८३०)
- चांदोली धरण - ३० (३७९०)