वारणावती : अतिवृष्टी व सलग चार महिने सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चांदोली धरण गुरुवारी सकाळी आठ वाजता शंभर टक्के भरल्याचे पाटबंधारे विभागाच्या प्रशासनाने अधिकृतपणे जाहीर केले. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने सांगली व कोल्हापूर जिल्'ातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
सांगली जिल्'ातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील व सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्'ातील सरहद्दीवर चांदोली धरण आहे. ३६७.१७ चौरस किलोमीटरचे पाणलोट क्षेत्र असलेल्या चांदोली धरणाची ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. हे राज्यातील मातीचे सर्वात मोठे धरण आहे. चांदोली धरण परिसरात ३० जुलैपासून ११ आॅगस्टअखेर तेरा दिवस अतिवृष्टी झाली होती. त्यावेळीच धरण शंभर टक्के सहज भरले असते. पण मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने धरणाच्या पाण्याचा विसर्ग मोठ्याप्रमाणात ठेवावा लागला. त्यामुळे वारणा नदीच्या पुराच्या पाण्याने रौद्ररूप धारण केले होते. त्यानंतर तब्बल १८ दिवसांनंतर २९ आॅगस्टपासून पुन्हा पावसाची संततधार सुरू झाली होती. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याची आवक वाढतच चालल्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरू केला होता. यामुळे वारणा नदीच्या पुराने पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली होती. पुन्हा पावसाने जोर कमी केल्याने धरणाच्या पाण्याचा विसर्ग कमी केला.
गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू होती. पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक काही प्रमाणात सुरूच होती. पावसाने आता विश्रांती घेतली आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्याचा साठा शंभर टक्के करण्यात आला आहे. चांदोली धरणात सध्या ९४७.१८८ दशलक्ष घनमीटर म्हणजे ३४.४० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पाण्याची पातळी ६२६.९० मीटर झाली आहे. जूनपासून आजपर्यंत ४६०५ मिलिमीटर एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या वीजनिर्मिती केंद्राकडून १२४५ क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरूच आहे. त्यामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे.