शिराळा : सागरेश्वर अभयारण्यातून शनिवार दि. १ रोजी चार चितळ आणून चांदोली अभयारण्यातील झोळंबी येथील स्थानांतरण केंद्रात सोडण्यात आली आहेत, अशी माहिती वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांनी दिली.ते म्हणाले की, सागरेश्वर येथून चांदोली अभयारण्यात सोडण्यासाठी चार चितळ आणण्यात आली. यापैकी दोन नर आणि दोन मादी आहेत. या चितळांना रात्री उशिरा चांदोली अभयारण्यातील झोळंबी येथील स्थानांतरण केंद्र येथे सोडण्यात आले.चितळ हे वाघाचे मुख्य खाद्य आहे. यामुळे शासनाने सागरेश्वर, कात्रज, सोलापूर येथून चितळ चांदोलीत सोडण्याची परवानगी दिली आहे. आठ हेक्टर क्षेत्राला कुंपण करून त्याचे प्रजनन करून संख्या वाढवण्याचा प्रयत्न आहे. याला यशही येत आहे. या आधी एप्रिल २०२२ मध्ये २४ चितळ सोडणेत आली होती. त्यांना ८ पिल्ली झाली आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी विभागीय वन अधिकारी गणेश पाटोळे व कर्मचारी उपस्थित होते.
Sangli- चांदोली अभयारण्यात चार चितळ सोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 1:42 PM