वारणावती : शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने चांदोली धरणात गतवर्षी दि. १७ मे २०१७ रोजी ११.४३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. यावर्षी दि. १७ मेरोजी १६.५४ टीएमसी इतके पाणी आहे. पाणी साठ्याची आकडेवारी लक्षात घेतल्यास, गतवर्षाच्या तुलनेत यंदा ५.११ टीएमसीने पाणीसाठा अधिक आहे.गेल्यावर्षी चांदोली धरण परिसरात २३९५ मिलिमीटर एवढा समाधानकारक पाऊस झाल्याने धरण १०० टक्के भरले होते. ३४.४० टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणाऱ्या चांदोली धरणामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, शाहुवाडी, पन्हाळा, तालुके सुजलाम् सुफलाम् झाले आहेत.
पिण्याच्या पाण्याबरोबर शेती व वीज निर्मितीसाठी या पाण्याचा वापर केला जातो. या धरणाच्या पाण्यावर २० मेगावॅट विजेची निर्मिती केली जाते. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरेशा पाण्यामुळे वीज निर्मिती सुरू असते. याच धरणातून दर १५ दिवसांनी कालव्यामार्फत शेतीसाठी पाणी सोडले जाते.सद्य:स्थितीत धरणातील पाणीसाठा पाहता, जूनअखेरपर्यंत येथील वीज निर्मिती सुरू राहील. शिवाय या परिसराला कोणतीही पाणी टंचाई भासणार नाही अशीच चिन्हे आहेत. गतवर्षी आजच्या तारखेला धरणात ३३.२२ टक्के पाणीसाठा होता. यंदा तोच पाणीसाठा ५८.८ टक्के आहे.