अशोक डोंबाळे
सांगली : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील कुस्तीच्या आखाड्यात यशस्वी झाल्यानंतर आता राजकारणाच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना व भारत राष्ट्र समितीसह सर्वच पक्षांकडून प्रस्ताव आला असून कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे, असेही चंद्रहार पाटील यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
येत्या चार महिन्यांत लोकसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मैदानात अनेक इच्छुक तयारीला लागले आहेत. मतदारसंघाचे दौरे सुरू केले असून जनाधार कुणाकडे आहे, याचाही कल घेतला जात आहे. भाजपकडून सध्या विद्यमान खासदार संजय पाटील व माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, तसेच काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या तीन उमेदवारांशिवाय चौथ्या उमेदवाराचे नाव आतापर्यंत चर्चेत नव्हते. पण, शनिवारी चंद्रहार पाटील यांनी आपल्याला सर्वच पक्षांकडून लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा प्रस्ताव असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.
सांगली लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य पक्षाची निवड करून लोकसभेच्या मैदानात उतरणार आहे, असे पाटील यांनी जाहीर केले. चंद्रहार पाटील यांच्या या घोषणेमुळे सांगली लोकसभेच्या मैदानात चाैथ्या उमेदवाराच्या नावाची चर्चा रंगली आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत तुल्यबळ लढती होण्याची शक्यता आहे.खासदारकीच्या मैदानात दुसरा पैलवान
हिंदकेसरी पैलवान मारुती माने हे १९८५ मध्ये राज्यसभेचे खासदार होते. त्यानंतर सांगली लोकसभा निवडणूक मैदानातून दिल्लीला जाण्यासाठी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने त्यांनी सांगली मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरू केली आहे. रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन एक लाख बाटल्या रक्त संकलन करण्याचा चंद्रहार पाटील यांनी संकल्प केला आहे.