सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच, चंद्रहार पाटील यांची मुंबईत मातोश्री भेट
By हणमंत पाटील | Published: March 6, 2024 11:19 AM2024-03-06T11:19:26+5:302024-03-06T11:20:53+5:30
सांगलीच्या जागेवर कॉंग्रेस ठाम
सांगली : लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले चंद्रहार पाटील यांनी मुंबईला मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची मंगळवारी भेट घेतली. तसेच, माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबईतील बैठकीत सांगलीची जागा कॉंंग्रेस लढविणार असल्याची ठाम भूमिका मांडली. त्यामुळे सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने कोल्हापूरच्या लोकसभा जागेच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेला सोडण्याची चर्चा दोन दिवसांपासून सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील व जयश्री पाटील यांच्यासह सांगलीच्या शिष्टमंडळाची बैठक मंगळवारी सकाळी मुंबईत झाली. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांनी शिष्टमंडळाची भूमिका ऐकून घेतली. तसेच, लोकसभेच्या तयारीचा आढावा घेतला.
विश्वजित कदम यांच्याकडून कानपिचक्या..
सांगलीच्या लोकसभा निवडणुकीसाठी विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी आम्ही सर्वजण ठाम आहोत. परंतु, निवडून आल्यानंतर तुम्ही सर्वांना मदत करायची, हे विसरू नका, अशा कानपिचक्या विश्वजित कदम यांनी विशाल पाटील समर्थकांना दिल्या.