खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 09:02 IST2025-04-22T09:00:23+5:302025-04-22T09:02:50+5:30
Vishal Patil Chandrakant Patil: सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांना पुन्हा भाजपकडून ऑफर देण्यात आली आहे. चंद्रकांत पाटलांनी सांगली दौऱ्यावर असताना त्यांच्याबद्दल विधान केले आहे.

खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
Maharashtra Politics News: सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना भाजपने पुन्हा एकदा सोबत येण्याची ऑफर दिली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, विशाल पाटलांनी भाजपत यावे, यासाठी सारखं म्हणत राहणार. काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे भाजपच्या वाटेवर असतानाच पाटलांनी केलेल्या या विधानाने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगली दौऱ्यामध्ये पुन्हा एकदा खासदार विशाल पाटील यांना भाजपसोबत येण्याची ऑफर दिली आहे. ते तरुण आणि हुशार आहेत. त्यामुळे मी हे सारखं म्हणत राहणार आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
"विशाल पाटलांनी भाजपमध्ये यावं"
"विशाल पाटील यांनी भाजपमध्ये यावं. पण, ते अपक्ष असल्यामुळे पार्टीमध्ये येता येत नाही. त्यांना सहभागी व्हावं लागेल. ते तरुण आहेत. हुशार आहेत. खूप प्रश्नांची जाण त्यांना आहे. त्यामुळे मी असा एक चांगला माणूस यावा, यासाठी सारखं म्हणत राहणार", असे चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले.
"संजयकाका पाटलांचं पुनर्वसन आता अजित पवारांनी करावं"
संजयकाका पाटील यांनी लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवली. पण, विधानसभा निवडणुकीत त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तासगाव विधानसभा मतदारसंघात त्याचा रोहित पाटलांनी पराभव केला.
हेही वाचा >>२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?
सध्या संजयकाका पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. त्यांच्या पुनर्वसनाबद्दल जेव्हा चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, "संजयकाका पाटील आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत. त्यामुळे त्यांचं पुनर्वसन अजित पवारांनी करायचं आहे. जुने नेते, जुने मित्र असल्यामुळे त्यांचं पुनर्वसन करण्यामध्ये आम्ही अजित पवारांना मदत करू", असे उत्तर पाटलांनी दिले.
विशाल पाटलांना महिनाभरात दुसऱ्यांदा ऑफर
खासदार विशाल पाटील यांच्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी दुसऱ्यांदा विधान केले आहे. मार्च महिन्यातही चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, 'राजकारणात नेहमी वर्तमानाचा विचार करून चालावं लागतं. त्यामुळे विशाल पाटील भाजपसोबत आले, तर भाजपाचे केंद्रातील संख्याबळ वाढेल आणि सांगलीच्या विकासालाही चालना मिळेल.'