सांगली - मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात काही 'पेड' लोक शिरलेत, त्यांना हे आंदोलन बदनाम करायचे आहे. निवडणूक काळात हे प्रकार वाढणार आहेत. पण आंदोलकांनी त्यांना खड्यासारखे बाजूला करावे, असं सांगत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा आंदोलकांना सावध केलं आहे. मंत्र्यांच्या गाड्या फोडून आरक्षण मिळणार असेल तर आमच्या गाड्या फोडा, पण मराठा आरक्षण हा विषय न्यायालयाच्या अखत्यारित आहे. त्यामुळे हिंसक आंदोलन करून समाजाचंच मोठं नुकसान होईल, अशी समजूत काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
काकासाहेब शिंदे यांनी गोदावरीत उडी मारून जीवन संपवलं, ही घटना दु:खद आहे. पण या मार्गाने प्रश्न सुटणार नाहीत. आम्ही सरकार म्हणून या आंदोलकांसोबत चर्चेला तयार आहोत असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. सरकारच्या हातात जेवढे आहे तेवढे आम्ही केले. आता आरक्षण हा विषय न्यायालयाच्या कक्षेत आहे. त्यामुळे जे हातात नाही त्यासाठी आंदोलन करून काही उपयोग होणार नाही असंही ते म्हणाले.