सांगली : भाजपकडे जनाधार असलेलं लोक नसल्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महसूलमंत्री चंद्रकांत पाटील पैशांचा पाऊस पाडतील, अशी टीका शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी केली. पत्रकारांशी संवाद साधताना किर्तीकर यांनी ही टीका केली. लवकरच सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत.'शिवसेनेकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. जनता आमच्यासोबत आहे. मात्र भाजप उसन्या उमेदवारांच्या जीवावर अवसान आणलं आहे. त्यामुळे ते या निवडणुकीत पैशांचा पाऊस पाडतील,' असे किर्तीकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं. 'आमच्याकडे जनाधार असलेले लोक आहेत. आम्ही तत्त्वानं सांगली, मिरज, कुपवाडमधील निवडणुका लढवणार आहोत. लोक आमच्यासोबत राहतील, असा विश्वास आम्हाला आहे. मात्र भाजपकडे यातील काहीच नसल्यानं पैशांचा पाऊस पडेल. चंद्रकांत पाटीलच या सर्व गोष्टी करणार आहेत. मात्र तरीही त्यांच्या पदरात फारसे काही पडणार नाही,' असं किर्तीकर यांनी म्हटलं.भाजपनं राज्यात अनेक ठिकाणी उसन्या उमेदवारांचा आधार घेऊन निवडणुका लढवल्या, अशी टीका किर्तीकरांनी केली. 'भाजपचं उसन्या उमेदवारांचं राजकारण फार काळ टिकणार नाही. आगामी महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार आहे. आमच्यासोबत कोणी नसलं, तरी आम्हाला कधी एकाकी वाटत नाही. आम्ही लढायला सक्षम आहोत. भाजप उपोषणाचा भंपकपणा करीत आहे. अनंत गीते मंत्री असल्यामुळे भाजपच्या उपोषणावेळी उपस्थित होते. मात्र शिवसेनेचा त्यांच्या आंदोलनाला पाठींबा नाही, असंही किर्तीकरांनी म्हटलं. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, आ. अनिल बाबर, पृथ्वीराज पवार, जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, संजय विभुते, जिल्हा संघटक दिगंबर जाधव, नगरसेवक शेखर माने उपस्थित होते.'कधीकाळी शिवसेनेशी राजू शेट्टी यांचे चांगले संबंध होते. मात्र त्यांनी आता काँग्रेसशी सलगी केली आहे. त्यांच्यासाठी गेल्यावेळी हातकणंगले मतदारसंघात आम्ही उमेदवार उभा केला नव्हता. मात्र आता शेट्टी स्वार्थापोटी काँग्रेसच्या बाजूनं गेले आहेत. त्यामुळे आता त्यांच्यासाठी आम्ही जागा सोडणार नाही, असं किर्तीकर यांनी स्पष्ट केलं. केडगावमधील शिवसैनिक हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. 'अहमदनगरमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या खून प्रकरणाच्या तपासात शासनाचं योग्य पाठबळ मिळत आहे. योग्य दिशेने तपासही सुरू आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत केलेली वाढ आणि शिवसैनिकांवरील हल्ले याचा काहीही संबंध नाही. शिवसैनिकांना कोणाचीही भीती वाटत नाही. आम्ही कोणत्याही संघर्षास सक्षम आहोत,' असं किर्तीकर यांनी म्हटलं.
'सांगली महापालिका निवडणुकीत चंद्रकांतदादा पैशांचा पाऊस पाडणार'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 5:21 PM