सांगली : शिराळा येथील नागपंचमी संपूर्ण राज्यात प्रसिध्द आहे. संपूर्ण राज्यातून भाविक नागपंचमीदिवशी शिराळ्याला येत असतात. सोमवारी (दि.२१) साजरी होणाऱ्या नागपंचमीदिवशी शिराळा येथील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनांच्या गर्दीने होणारी कोंडी टाळण्यासाठी संपूर्ण दिवसभरात वाहतूक मार्गातील बदल लागू असणार आहेत. पेठनाका ते शिराळापर्यंतच्या वाहतूक मार्गातही पर्याय देण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.राष्ट्रीय महामार्ग क्र. चारवरील पेठनाका येथून सर्व वाहने एकेरी मार्गाने शिराळ्याकडे जातील. शिराळ्याकडून राष्ट्रीय महामार्ग चारकडे जाणारी सर्व वाहने शिराळा बायपासमार्गे कापरी, कार्वे, ढगेवाडी फाटा, ऐतवडे बुद्रुक फाटा, लाडेगाव, वशी आणि येडेनिपाणी फाटा या मार्गाने महामार्गाकडे जातील. शिराळा बायपास येथून पेठनाक्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील.नागपंचमीदिवशी शिराळा येथे भाविकांची गर्दी असते. यात्रेस जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर भाविक, यात्रेकरू मोठ्या संख्येने वाहनाने येत असतात. नागपंचमीदिवशी शिराळ्यात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड असते. त्यामुळे नियमित रस्त्यांवर वाहतुकीचा ताण पडून रहदारीस अडथळा होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पेठनाका ते शिराळापर्यंतच्या वाहतूक मार्गात दि. २१ऑगस्ट रोजीसाठी बदल केल्याचे आदेश दिले आहेत.
Sangli News: नागपंचमीदिवशी शिराळ्याला जाताय? त्याआधी वाचा ही बातमी
By शरद जाधव | Published: August 17, 2023 6:29 PM