ऐतवडे बुद्रुक : वाढते कौटुंबिक हिंसाचार ही सामाजिकदृष्ट्या गंभीर बाब असून यामुळे नाती विकोपाला जातात. त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा झालेला दिसून येतो. याचे चिंतन होणे गरजेचे आहे. विचार बदला, जीवन बदलेल. आजच्या युवक-युवतीने समाजोपयोगी अभियानात सहभागी होऊन समाजाचे ऋण फेडावे, असे प्रतिपादन सन्मती संस्कार मंचचे संस्थापक सुरेश चौगुले यांनी केले.
ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा )येथे राज्य स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या युवक-युवतींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सरपंच प्रतिभा बुद्रुक, कैलास आवटी, मनोहर चौगले, प्रा. पुष्पक पाटील, देशभूषण मगदूम, नंदाताई लिंबिकाई, अरविंद पाटील प्रमुख उपस्थित होते.
चौगुले म्हणाले, परिस्थितीची जाणीव ठेवा. केवळ जिद्द, चिकाटी, परिश्रमाच्या जोरावर ग्रामीण भागातील युवक-युवती प्रतिकूल परिस्थितीतही स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन उच्चपदांवर पोहोचले आहेत.
यावेळी प्रा. वर्धमान बुद्रुक, प्रा. पुष्पक पाटील, प्रा. सुनील परमाज, सौरभ आवटी यांनी मार्गदर्शन केले. ज्योती आवटी यांनी स्वागत केले. रूपाली परमाज यांनी सूत्रसंचालन केले. मनीषा वाडकर यांनी आभार मानले.