सांगली : विद्यापीठ कायद्यातील बदलाविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी केली. दरम्यान, आंदोलकांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.१५ डिसेंबरच्या मंत्रीमंडळ बैठकीत विद्यापीठ कायद्यात बदलाचा निर्णय झाला होता. आंदोलकांनी आरोप केला की, अधिवेशनात कोणत्याही चर्चेविना निर्णय घेऊन राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी पाठविला आहे. प्रस्तावित सुधारीत तरतुदीमुळे राज्यपालांना कुलगुरूंची थेट नियुक्ती करता येणार नाही. शासनाने सुचविलेल्या दोन नावांमधूनच निवड करावी लागेल.
याद्वारे शासन कुलपतींच्या अधिकारात हस्तक्षेप करीत आहे. विद्यापीठामध्ये प्र कुलपती हे नवीन पद प्रस्तावित आहे. त्यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची नियुक्ती केली जाणार आहे. याद्वारे विद्यापीठांच्या स्वायतत्तेवर नियंत्रण आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.यामुळे विद्यापीठाच्या कामकाजात राजकीय पक्ष, नेत्यांचा अवाजवी हस्तक्षेप वाढेल. कुलपती तथा राज्यपालांच्या अधिकारांवरही अतिक्रमण होईल. गुणवत्ताधारक प्राध्यापक, विद्यार्थ्यांवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. प्रत्येक निर्णयासाठी शासनावर अवलंबून रहावे लागेल. गुणवत्ता ढासळेल. त्यामुळे या बदलांना तीव्र विरोध केला.आंदोलकांनी आदी. मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेच पुढील टप्प्यात शुक्रवारी (दि. २५) विद्यापीठांमध्ये आंदोलन करणार असल्याचे जिल्हा संयोजक ऋषीकेश पोतदार यांनी सांगितले.आंदोलनात अजय मोहिते, ऋषीकेश पाटील, दर्शन मुंदडा, ऋषीकेश पोतदार, दया उगले, उत्तरा पुजारी, अथर्व कुलकर्णी आदींनी भाग घेतला.