सांगली : महावितरण कंपनीने मे महिन्याच्या भारनियमनामध्ये शेतीपंपाला सोमवार ते गुरुवार दिवसा आठ तास, तर शुक्रवार ते रविवारी रात्री सहा आणि दिवसा चार तास वीज देण्यात येणार आहे. रात्रीचे भारनियमन चार तासाने कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
महावितरण कंपनीने दि. १ मेपासून शेतीपंपाच्या भारनियमनाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये सोमवार ते गुरुवार सकाळी ११.१० ते सायंकाळी ७.१० आणि शुक्रवार ते रविवार रात्री १.१० ते सकाळी ११.१० अशा वेळा जाहीर करण्यात आल्या आहेत. शुक्रवार ते रविवार या तीन दिवसाच्या कालावधीत रात्रीचे भारनियमन सहा तासच ठेवले आहे. महावितरणच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. पण महावितरण कंपनीने देण्यात येणारी वीज अंखडित आणि पूर्ण दाबाने वीजपुरवठा झाला पाहिजे, अशी मागणीही शेतकऱ्यांची आहे.