सांगली : झरे (ता. आटपाडी) येथे उद्या आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीमुळे या भागात जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बैलगाडी शर्यती आयोजित करण्यास सर्वोच्च न्यायालयाकडूनच बंदी असल्याने शर्यत आयोजित करू नये, असे आदेश आहेत. त्यामुळे आज गुरुवार आणि शुक्रवारी झरे परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.
गुरुवार सकाळी सहापासून शुक्रवारी रात्रीपर्यंत हा आदेश लागू असणार आहे. वाहतूक मार्गात केलेल्या बदलानुसार कराडहून पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांसाठी कराड, मायणी, विटा, भिवघाट, आटपाडी दिघंचीमार्गे पंढरपूर, याशिवाय कराड, मायणी, कुकुडवाड, म्हसवडमार्गे पंढरपूर, पंढरपूरहून येणाऱ्या वाहनधारकांनाही हाच मार्ग असणार आहे. झरे ते खरसुंडी जाण्यासाठी झरे विभूतवाडी, तरसवाडी फाटा, घरनिकीमार्गे खरसुंडीमार्ग असणार आहे. खरसुंडीहून झरेकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खरसुंडी, घरनिकी पिंपरी बुद्रुक तरसवाडी फाटा विभूतवाडीमार्ग असणार आहे.