लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : विट्याच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील यांच्या सत्ताधारी गटाच्या सुभाष श्रीरंग भिंगारदेवे यांची बिनविराेध निवड करण्यात आली. उपनगराध्यक्षा रूपाली पाटील यांच्यानंतर भिंगारदेवे यांना संधी देण्यात आली. नगरपालिका निवडणूक तोंडावर असताना, भिंगारदेवे यांच्या रूपाने दलित समाजाला सत्ताधारी गटाने संधी दिली आहे.
नगराध्यक्षा प्रतिभा पाटील लोकनियुक्त पदाधिकारी असल्याने उपनगराध्यक्ष पदावर जास्तीत-जास्त नगरसेवकांना संधी देण्याचा निर्णय सत्ताधारी गटाने घेतला होता. मावळत्या उपनगराध्यक्षा रूपाली पाटील यांचा निर्धारित कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नगराध्यक्षांकडे राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर बुधवारी पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्या उपस्थितीत उपनगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया झाली.
भिंगारदेवे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गंगाधर लकडे, विश्वनाथ कांबळे, नगरसेवक फिरोज तांबोळी, संजय तारळेकर, अरुण गायकवाड, मनीषा शितोळे, प्रतिभा चोथे, ॲड. राजेंद्र भिंगारदेवे, अविनाश चोथे, संजय सपकाळ उपस्थित होते.