मिरज : ख्वाजा शमाना मिरासाहेब दर्ग्याच्या उरुसास सोमवारी उत्साहात सुरुवात झाली. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारा चर्मकार समाजाचा मानाचा गलेफ सकाळी अर्पण करण्यात आला.मिरजेत उरुसाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली. यंदाचा ६४९वा उरुस असून चर्मकार समाजाच्या मानाचा गलेफ अर्पण करताना भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सोमवारी पहाटे परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात उरुसाला सुरुवात झाली. गलेफसाठी राज्यासह देशभरातील चर्मकार बांधवांसह इतर धर्मीय लोक सहभागी होतात. मिरजेतील सातपुते वाड्यातून गलेफ मिरवणुकीस सुरुवात झाली. पार कट्टा, महादेव मंदिर, मंडई रोड, नगरखाना कमानीतून प्रवेश करून सकाळी सूर्योदयापूर्वी गलेफ अर्पण करण्यात आला. पारंपारिक वाद्याच्या तालावर फटाक्यांची आतषबाजी करीत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सातपुते सातपुते वाड्यातील बाबूलाल सातपुते, श्रीकांत सातपुते, दत्तात्रय सातपुते, शरद सातपुते, विशाल सातपुते, बसवेश्वर सातपुते, तानाजी सातपुते, आनंदा देवमाने आदी समाजबांधवांसह माजी महापौर इद्रिस नायकवडी, महादेव कुरणे, अतहर नायकवडी आदी उपस्थित होते.
मिरज दर्ग्याला चर्मकार समाजाचा मानाचा गलेफ अर्पण; हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा, उरुसास प्रारंभ
By अविनाश कोळी | Published: February 05, 2024 1:58 PM