मृतदेहाच्या अंत्यविधीसाठी गेल्यानंतर पैशाची मागणी होऊ लागली आहे. महापालिकेने गेल्या ९ महिन्यांपासून साहित्य पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराचे बिल दिले नसल्याने साहित्य पुरवठा बंद करण्यात आला आहे. यामुळे खड्डा खोदण्यास व अंत्यविधीसाठी इतर साहित्यासाठी ठेकेदार किमान तीन हजार रुपये घेत असल्याने गरिबांना आर्थिक फटका बसत आहे.
महापालिकेतर्फे महापालिका क्षेत्रातील सर्व स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य पुरवण्यात येत आहे. मात्र, लिंगायत दफनभूमीतच साहित्य पुरवठा बंद करण्यात आल्याने चार दिवसांत मोफत साहित्य पुरवठा सुरू करण्यात यावा. अंत्यविधीसाठी लिंगायत बांधवांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही, याची महापालिकेने व्यवस्था घ्यावी, अन्यथा महापालिका क्षेत्रातील लिंगायत बांधव आंदोलन करणार असल्याचे लिंगायत समाजोन्नती परिषद अध्यक्ष व भाजपा शहराध्यक्ष बाबासाहेब आळतेकर यांनी महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.