सांगली : येथील हनुमान नगरमधील तिसऱ्या गल्लीत गुंड गणेश बसाप्पा माळगे (वय २७, रा. स्वामी समर्थ मंदिरजवळ, त्रिमूर्ती कॉलनी, सांगली) याचा धारदार शस्त्राने हल्ला करुन व दगडाने डोके ठेचून निर्घृण खून करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. माजी नगरसेवक राजू गवळी यांचा भाचा धनंजय गवळी याच्यासह सात हल्लेखोरांनी हा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. राजू गवळी यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
गणेश माळगे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. खुनाच्या प्रयत्नासह चार गुन्हे त्याच्याविरुद्ध नोंद आहेत. सहा महिन्यापूर्वी त्याने धनंजय गवळी याच्यावर हनुमान नगरमध्ये खुनीहल्ला केला होता. याप्रकरणी माळगेला अटक केली होती. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत सांगलीच्या कारागृहात होता. पंधरा दिवसांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता. मंगळवारी सायंकाळी त्याचे मित्र ओंकार पाटील व प्रथमेश कदम यांच्यासोबत तो दुचाकीवरुन (क्र. एमएच १० सीके ३५८५) हनुमान नगरमध्ये तिसºया गल्लीत गेला होता. याच गल्लीत धनंजय गवळी राहतो. माळगेला वाघमारे नामक मित्र तिथे भेटला. त्याच्याशी माळगे बोलत उभा राहिला. तेवढ्यात समोरुन धनंजय गवळी हा त्याच्या साथीदारासह आला. त्याच्या हातात धारदार हत्यार होते. त्या दोघांनी गणेशवर शिवीगाळ करीत हल्ला चढविला. हा प्रकार पाहून माळगेचे मित्र दुचाकी टाकून पळून गेले. माळगेही जीव वाचविण्यासाठी पळत सुटला. पण हल्लेखोरांनी त्याचा पन्नास मीटरपर्यंत पाठलाग केला व त्याला गाठून हातावर, डोक्यावर वार केले. त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घातला. गणेश रक्ताच्या थारोळ्यात पडताच हल्लेखोर पळून गेले.
माळगेवर हल्ला झाल्याचे समजताच त्याच्या नातेवाईकांनी हनुमाननगरमध्ये धाव घेतली. त्याला रिक्षातून सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले; पण वैद्यकीय अधिकाºयांनी तो मृत झाल्याचे घोषित करताच नातेवाईकांनी आक्रोश सुरू केला. माळगे विवाहित आहे. त्याला एक लहान मुलगी आहे. त्याचा भाऊ एका माजी आमदाराच्या वाहनावर चालक म्हणून काम करतो. या घटनेचे वृत्त वाºयासारखे पसरताच रुग्णालयात माळगेच्या मित्रांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. घटनास्थळीही बंदोबस्त ठेवण्यात आला होता.दहा वार करून ठेचलेरात्री उशिरा विच्छेदन तपासणी झाल्यानंतर माळगेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या डोक्यात, कपाळावर, हातावर असे एकूण दहा वार आहेत. वार केल्यानंतर पुन्हा त्याचे डोके दगडाने ठेचले आहे. डावा हात मनगटातून तुटलेल्या स्थितीत होता. रिक्षातून रुग्णालयात आणल्यानंतर पोर्चमध्ये सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. चाकू आणि कोयत्याचा वापर केला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.दगड, दुचाकी जप्तजिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे, पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, गुंडाविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक संतोष डोके यांच्यासह हवालदार महेश आवळे, सागर लवटे, युवराज पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा करताना गणेशच्या डोक्यात घातलेला दगड तसेच त्याची दुचाकी जप्त केली आहे.
राजू गवळी ताब्यातमाजी नगरसेवक राजू गवळी हे घटनास्थळी उभे होते. गुंडाविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक संतोष डोके यांनी त्यांच्याकडे या घटनेच्या अनुषंगाने चौकशी केली. त्यानंतर त्यांना ताब्यातच घेतले. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. चौकशीत त्यांचा भाचा धनंजय हा मुख्य संशयित हल्लखोर असल्याचे स्पष्ट झाले आहेत. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाचा बदला घेण्याच्या हेतूनेच माळगेचा खून केल्याची माहिती सध्या तरी पुढे येत आहे.