सांगली : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहीमेत अडथळा आणून पथकाला दमदाटी केल्याप्रकरणी स्वाभिमानी विकास आघाडीच्या एका नगरसेवकाचे पद धोक्यात आले आहे. तर नगरसेविका पतीवर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. त्यामुळे या दोघांचे धाबे दणाणले असून आयुक्तांना याबाबत नोटीस बजावण्याचे आदेश गुरुवारी देण्यात आले आहेत. याचा खुलासा आल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
महापालिकेने बुधवारी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मेन रोड, बालाजी चौक, झाशी चौक ते मारुती चौक या परिसरातील अतिक्रमणं हटवण्याची मोहीम हाती घेतली होती. महिन्याभरापूर्वी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, आयुक्त रवींद्र खेबूडकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या बैठकीत रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यावर चर्चा झाली होती. वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक अतुल निकम यांनी मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांचा सर्व्हेही केला होता. रस्त्यावर हातगाडी, फेरीवाले, किरकोळ विक्रेते अशा 240 जणांचे अतिक्रमण असल्याचे आढळून आले होते. पण दिवाळीचा सण तोंडावर असल्याने महापालिका व पोलिसांने त्यांच्यावर कारवाई टाळली होती. महापालिका व वाहतूक शाखेने बुधवारी संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम राबवत मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणांवर हातोडा टाकला.
झाशी चौकापासून या मोहीमेला सुरूवात झाली. बालाजी चौक, मेन रोड व मारुती रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात आली. यावेळी रस्त्याच्या कडेला बसणारे फळ विक्रेते गायब झाले होते, तर दुकानदारांनी रस्त्यावर थाटलेले मंडप काढून घेतले. त्यामुळे हा रस्ता ब-याच वर्षानंतर वाहतुकीला सुस्थितीत झाला होता. त्यानंतर महापालिकेचे पथक मारुती चौकात आले असता, तिथे मात्र स्वाभिमानी आघाडीचे नगरसेवक बाळासाहेब गोंधळे व नगरसेविकापती हेमंत खंडागळे यांनी या मोहिमेला ब्रेक लावला. त्यांनी पथकाशी वाद घालून जप्त केलेले साहित्यही परत करण्यास भाग पाडले होते.
या प्रकाराची आयुक्त खेबूडकर यांनी गुरुवारी गंभीर दखल घेतली. अतिक्रमण पथकासोबत बैठक घेऊन बुधवारी घडलेल्या प्रकराची त्यांनी माहिती घेतली. सहाय्यक आयुक्त एस. व्ही. पाटील यांना वादावादीबाबत लेखी टिपणी देण्याचे आदेश दिले. अतिक्रमण काढताना अडथळा करणा-यांवर काय कारवाई करता येईल, याबाबत त्यांनी महापालिकेचे कायदे सल्लागार अॅड. सुशील मेहता व उपायुक्त सुनील पवार यांच्याशीही चर्चा केली. पत्रकारांशी बोलताना खेबूडकर म्हणाले की, रस्त्यावर वाहतुकीला अडथळा करुन व्यवसाय करणे गैरच आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो. त्यासाठीच टप्पा-टप्प्याने रस्त्यावरील अतिक्रमणे हटविणार आहोत. त्याचा एक भाग म्हणून मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले होते. सांगली व मिरजेचे उपायुक्त व चारही सहाय्यक आयुक्तांवर अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी सोपविली आहे. बुधवारी लोकप्रतिनिधींनी अतिक्रमण हटविताना अडथळा आणला. त्यांचे कृत्य चुकीचेच आहे. त्याबाबत कायदेशीर कारवाई केली जाईल. महापालिकेकडून केवळ मोहीम आखण्यावरच भर राहणार नाही, तर विक्रेत्यांचे पुनर्वसनही केले जाईल. त्यासाठी आम्ही नियोजन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.