सुरेंद्र शिराळकर ल्ल आष्टा सत्ताधारी, माजी आमदार विलासराव शिंंदे, माजी ग्रामविकासमंत्री आ. जयंत पाटील व विरोधी आष्टा शहर लोकशाही आघाडी यांच्यातील आष्टा नगराध्यक्षपदासाठी सामना चुरशीचा होणार आहे. माजी नगराध्यक्षा सौ. रंजना शेळके, सौ. झिनत अत्तार, सौ. वैशाली बोते, सौ. आयेशा इनामदार यांच्यासह आ. पाटील गटाच्या सौ. पुष्पलता माळी. सौ. जमिलाबी लतीफ, सौ. सुशिला शेळके, सौ. अलका माने यांचा सामना विरोधी आघाडीच्या सौ. लता पडळकर यांच्याशी होण्याची शक्यता आहे. आष्टा पालिकेत माजी आ. विलासराव शिंंदे, आ. जयंत पाटील गटाची सत्ता आहे. १९९७ पासून रमेश जन्नर, अरुण मोटकट्टे, चिंंगुताई शेळके, आक्काताई कोळी, झुंझारराव शिंंदे, सज्जन मोहिते, एकनाथ वरणे, मंगलादेवी शिंंदे, श्रीपाल कुंबळे, झुंझारराव पाटील, सौ. झिनत अत्तार, सौ. रंजना शेळके व त्यानंतर पुन्हा मंगलादेवी शिंंदे यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे. मागील पाच वर्षे आष्टा पालिकेत महिलाराज होते. पुन्हा ओबीसी महिला आरक्षण असल्याने सलग दहा वर्षे पालिकेत महिलाराज राहणार आहे. आष्टा पालिकेच्यावतीने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. १६१ वर्षे पूर्ण केलेल्या पालिकेत नगराध्यक्षपदी संधी मिळावी म्हणून इच्छुकांनी कंबर कसली आहे. माजी नगराध्यक्षा सौ रंजना शेळके या शांत, संयमी आहेत. सौ. झिनत अत्तार या मनमिळाऊ, लोकप्रिय आहेत. नगरसेवक बाबा सिद्ध यांच्या पत्नी सौ. मंगल सिद्ध, सामाजिक कार्यकर्ते रुकमोद्दीन इनामदार यांच्या पत्नी सौ. आयेशा इनामदार, आनंदराव शेळके यांच्या पत्नी वैशाली शेळके, संभाजी माळी यांच्या सौभाग्यवतीनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. यांच्यासह भगवान बोते यांनी उपनगराध्यक्षपद भूषविले आहे. त्यांच्या पत्नी सौ. वैशाली बोते याही दावेदार आहेत. जयंत पाटील गटाचे दिलीप पाटील यांचे निष्ठावंत सतीश माळी यांच्या पत्नी सौ. पुष्पलता माळी, नगरसेविका सौ. जमिलाबी अब्बास लतीफ यांनी नगरसेवक म्हणून चांगली कामगिरी केली आहे. माणिक शेळके यांच्या मातोश्री सौ. सुशिला शेळके, आ. जयंत पाटील गटाचे कार्यकर्ते मयूर धनवडे यांच्या पत्नी सौ. स्मिता धनवडे, अर्जुन माने यांच्या पत्नी सौ. अलका माने यांच्यासह माजी नगराध्यक्ष जानकास ढोले, बाबा ढोले, रामचंद्र शिध्द यांच्या घरातील महिलांना संधी मिळण्याची शक्यता आहे. विरोधी लोकशाही आघाडीच्यावतीने अमोल पडळकर यांच्या पत्नी सौ. लता पडळकर यांचे नाव आघाडीवर असून, त्यांनी प्रचार सुरु केला आहे. सत्ताधारी गटाच्या उमेदवार कोण, याची चर्चा असून, अंतिम निर्णय माजी आ. विलासराव शिंंदे हेच घेणार आहेत. त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
आष्ट्याच्या नगराध्यक्ष पदासाठी चुरस
By admin | Published: October 10, 2016 12:45 AM