अशोक पाटील-- इस्लामपूर -आगामी इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतून उमेदवारी देताना विद्यमान नगरसेवकांसह कार्यकर्त्यांच्या सामाजिक कार्याचे प्रगतीपुस्तक तपासावे. जेणेकरुन पालिकेच्या सभागृहाला प्रामाणिकपणे काम करणारे लोकप्रतिनिधी मिळतील. यामुळे शहराच्या विकासाला गती येईल, अशी अपेक्षा इस्लामपूर येथील नागरिकांतून व्यक्त होत आहे. उमेदवार निवडीवेळी माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्यापुढे मोठे आव्हान असणार आहे.गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ आमदार जयंत पाटील यांच्या समर्थकांची पालिकेवर सत्ता आहे. यामध्ये बहुतांशी ज्येष्ठ नगरसेवक सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. तरीसुध्दा आगामी निवडणुकीत हे ज्येष्ठ नगरसेवक मोठ्या उमेदीने निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागले आहेत. याच ज्येष्ठ नगरसेवकांच्या घरातील युवा पिढीलाही आता निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीमधील अंतर्गत कुरघोड्यांना उत येणार आहे. याचा फायदा विरोधकांना होणार का? यावरही प्रश्नचिन्ह आहे. मुळात आजमितीसही विरोधकांच्यात ताळमेळ नाही.पालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी निवडीसाठी राष्ट्रवादीच्यावतीने सुकाणू समिती गठित केली जाते. या समितीत ९० टक्केहून अधिक सदस्य विद्यमान नगरसेवकच असतात. हेच नगरसेवक आपल्या नावाला हिरवा कंदील दाखवत असल्याने सुशिक्षित युवा पिढीला संधी मिळत नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्षे तेच ते चेहरे पालिकेच्या सभागृहात दिसतात. यामुळे आमदार जयंत पाटील आगामी निवडणुकीसाठी सुकाणू समितीत नगरसेवक वगळून विविध क्षेत्रातील व राजकीय ज्ञान असलेल्यांना सदस्य म्हणून निवडावे. जेणेकरुन सुशिक्षित व समाजोपयोगी कार्यकर्त्याला न्याय मिळेल.इस्लामपूर पालिकेच्या बहुतांशी निवडणुकीचा अनुभव पाहता राष्ट्रवादीची सुकाणू समिती ही फक्त नावालाच असते. अंतिम निर्णय आमदार जयंत पाटील घेतात. या मुलाखतीमध्ये कार्यकर्त्यांची निष्ठा आणि सामाजिक कार्याची दखल न घेता तो किती पैसे खर्च करू शकतो, यावरच उमेदवारीवर शिक्कामोर्तब होत असते. निवडणुकीतही लाखो रुपये खर्च करावे लागत असल्याने पुढील पाच वर्षाच्या काळात नगरसेवक जनतेच्या तिजोरीतून कसा पैसा काढता येईल, यावरच लक्ष ठेवून असतो. त्यामुळे शहरातील विकासाला मोठी खीळ बसली आहे.एकंदरीत केंद्र व राज्यातील भाजपची सत्ता विचारात घेता, आगामी काळात राष्ट्रवादीला चांगले दिवस येण्यासाठी आमदार जयंत पाटील यांनी पालिकेच्या निवडणुकीत उच्चशिक्षित व चांगली प्रतिमा असणारे उमेदवार देणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त होऊ लागली आहे.इस्लामपूर नगरपालिकेच्या आगामी होणाऱ्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. यासाठी सर्वच पक्षीय कार्यकर्ते एकत्र येत आहेत. विरोधकांची एकजूट राहणार का? हाही प्रश्न निर्माण झाला आहे. सर्व विरोधक एकत्र आल्यास नगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विकासाला गती देणाऱ्या लोकप्रतिनिधींची गरज इस्लामपूर शहरात निवारा, पाणी, गटारी, दिवाबत्ती या मूलभूत सुविधा महत्त्वाच्या आहेत. लोकसंख्येचा आणि प्रभागांचा विचार करता बहुतांशी प्रभागात या सुविधांचा अभाव आहे. झालेली विकासकामे निकृष्ट आहेत. बहुतांशी विकासकामे नियोजनाअभावी ठप्प आहेत. त्यामुळे आगामी काळात शहरातील विकासकामांना गती देणाऱ्या लोकप्रतिनिधींची गरज आहे. याचाही विचार आमदार जयंत पाटील यांनी करणे गरजेचे आहे.पालिकेच्या सभागृहात कुरघोड्यांचे राजकारण करून स्वत:चे दुकान चालविणाऱ्या सदस्यांना अर्धचंद्र देण्याची गरज आहे. नगरपालिकेचा कारभार पारदर्शी चालण्यासाठी चांगल्या प्रतिमेच्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळणे महत्त्वाचे आहे. शहराच्या विकासाची जाण असणाऱ्या कार्यकर्त्यांनाच राष्ट्रवादीतून संधी मिळावी.- अॅड. सुधीर पिसे, माजी नगराध्यक्ष इ.न.पा.
विद्यमान नगरसेवकांचे प्रगतीपुस्तक तपासा
By admin | Published: May 29, 2016 11:10 PM