सांगली : मुदत ओलांडून गेलेले जिल्ह्यातील अडीच हजार रिक्षा परवाने नूतनीकरण करण्यास परिवहन आयुक्तांनी मान्यता देऊनही, त्यास कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. नूतनीकरणास १६ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे, तरीही रिक्षा चालकांचा प्रतिसाद मिळणार नसल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांनी शुक्रवारपासून रिक्षांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. परवाना नूतनीकरण नसताना रिक्षा फिरविणाऱ्या चालकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. राज्यातील हजारो रिक्षा परवाने मुदतीत नूतनीकरण न झाल्याने बाद झाले होते. रिक्षा संघटनांनी याप्रश्नी आंदोलन करुन, परवाने नूतनीकरण करण्यास मान्यता देण्याची मागणी केली होती. त्यानुसार परिवहन आयुक्तांनी गेल्या महिन्यात संघटनांची ही मागणी मान्य केली होती. दि. १ ते ३१ आॅक्टोबर या कालावधित परवाने नूतनीकरण करून घेण्याचा आयुक्तांना आदेश दिला होता. पण सांगली जिल्ह्यात त्यास रिक्षाचालकांचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. २९ आॅक्टोबरपर्यंत एकही अर्ज नूतनीकरणास आला नाही. नूतनीकरणाची प्रक्रिया किचकट असल्याचे रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे. २० रुपयांपासून दोन हजारापर्यंत दंड आहे. पण त्यापूर्वी विमा, पासिंग या गोष्टी पूर्ण करुन घेण्याची अट आहे. या सर्व बाबींची प्रक्रिया करायची म्हटले तरी किमान २५ ते ३० हजार रुपये लागणार आहेत. चालकांना ते परवडणारे नाही, असे प्रतिनिधींचे म्हणणे आहे.चालकांचा नूतनीकरणास थंडा प्रतिसाद असल्याचे पाहून परिवहन आयुक्तांनी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढवून देऊन शुक्रवारपासून रिक्षांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. आरटीओ दशरथ वाघुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके तयार केली आहेत. ही पथके रिक्षांची तपासणी करतील. यामध्ये परवाना नूतनीकरण, विमा, पासिंग व फिटनेस याची तपासणी करणार आहेत. ज्या रिक्षांचे परवाने नूतनीकरण केलेले नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे रिक्षाचालकांनी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावीत, असे आवाहन वाघुले यांनी केले आहे. ते म्हणाले की, १५ नोव्हेंबरपर्यंत परवाने नूतनीकरण करुन घ्यावेत. जे चालक नूतनीकरण करणार नाहीत, त्यांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया दि. १६ ते २३ नोव्हेंबर या कालावधित राबविली जाईल. तसेच शासनाने नवीन परवाने खुले केल्यास त्यातील परवाने दिले जाणार नाहीत. (प्रतिनिधी)रिक्षा संघटना : मुदत वाढवून द्यावीराज्य रिक्षा कृती समितीचे सदस्य सुरेश गलांडे, सांगली जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव पवार, सचिव अरुण धनवडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात परवाना नूतनीकरणास एक वर्षाची मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. आधी पासिंग, मग नूतनीकरण ही अट रद्द करावी. प्रथम नूतनीकरणास प्राधान्य द्यावे. रिक्षाचालकांच्या आर्थिक स्थितीचा विचार करावा. एकाचवेळी सर्व बाबींची पूर्तता करण्याची चालकांची स्थिती नाही, असे त्यात म्हटले आहे.
रिक्षांची आजपासून तपासणी
By admin | Published: October 29, 2015 11:29 PM