ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 20 - सांगलीत दोन मे पासून बुध्दिबळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नूतन बुध्दिबळ मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ शिरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नूतन बुध्दिबळ मंडळाच्या स्थापनेला ७५, तर मंडळाच्या राष्ट्रीय स्पर्धा सुरू होऊन ५० वर्षे पूर्ण झाली. २०१६-१७ हे मंडळाचे सुवर्णामृत वर्ष आहे. यानिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबविले आहेत. २ ते २९ मे दरम्यान सांगलीतील बापट बाल विद्यामंदिरमध्ये सांगली बुध्दिबळ महोत्सव होणार आहे. या महोत्सवातील रेटिंग स्पर्धा वातानुकूलित सभागृहात होणार आहेत. या महोत्सवात एकूण अकरा स्पर्धा होणार असून, त्यासाठी एकूण नऊ लाखांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
या महोत्सवात होणा-या विविध स्पर्धा अशा : बाबूकाका शिरगावकर, आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन खुली स्पर्धा, मीनाताई शिरगावकर आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन महिला स्पर्धा, तम्माण्णाचार्य पडसलगीकर स्मृती आठ वर्षाखालील स्पर्धा, लीलाताई रामचंद्र देशपांडे स्मृतती १० वर्षाखालील स्पर्धा, अॅड. आबासाहेब गानू स्मृती १२ वर्षाखालील स्पर्धा, सीताबाई भिडे स्मृती १४ वर्षाखालील स्पर्धा, श्रीमंत दादासाहेब गाडगीळ सराफ स्मृती १६ वर्षाखालील स्पर्धा, काकासाहेब टिकेकर स्मृती २५ वर्षाखालील स्पर्धा, इनामदार खुली स्पर्धा, एन. आर. जोशी अखिल भारतीय जलद स्पर्धा, श्रीमंत बाळासाहेब लागू खुल्या जलद स्पर्धा. आंतरराष्ट्रीय पंच नितीन शेणवी व दीपक वायचळ पंच म्हणून काम पाहणार आहेत. १३ ते १५ मे दरम्यान नूतन बुध्दिबळ मंडळातर्फे बुध्दिबळ प्रशिक्षण वर्ग आयोजित केले आहेत. खेळाडूंनी लाभ घेण्याचे आवाहन शिरगावकर यांनी केले आहे. यावेळी अखिल मराठी बुध्दिबळ संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य रमेश चराटे, चिंतामणी लिमये, सीमा कठमाळे, दीपक वायचळ, कुमार माने, डॉ. उल्हास माळी, स्मिता केळकर आदी उपस्थित होते.
बुध्दिबळ भवनासाठी क्रीडा मंत्र्यांची भेट...
सांगलीतील जिल्हा क्रीडा संकुलमध्ये उभारण्यात येणाºया बुध्दिबळ भवनाचा विषय राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्यापर्यंत जाऊन धडकला आहे. बुध्दिबळ भवनाचे काम त्वरित चालू व्हावे यासाठी नूतन बुध्दिबळ मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ शिरगावकर, सचिव चिंतामणी लिमये व राष्ट्रीय पंच दीपक वायचळ यांनी क्रीडामंत्र्यांच्या भेटीची वेळ घेतली असून, ते मुंबईत भेटून निवेदन देणार आहेत.