सांगली : कवठेमहांकाळ तालुका तसा दुष्काळीच. गेल्या एक दोन वर्षात अल्प पावसामुळे तालुक्यात सध्या दुष्काळस्थिती आहे. तालुक्यातील सर्व गावांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या टंचाईपरिस्थितीवर मात करण्यासाठी शासन आणि प्रशासन यांच्यामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये चुडेखिंडी येथे उभारलेली चारा छावणी चुडेखिंडीसह परिसरातील 5 किलोमीटर अंतरामधील जांभुळणी आणि चोरोची या गावामधील पशुधनासाठी तारणहार ठरली आहे.या दुष्काळी टापूत दुग्ध व्यवसाय हे प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. गेली दीड वर्षे पाऊस नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होता. अशा स्थितीत पशुधन वाचवण्याचे मोठे आव्हान होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळी उपाययोजनांबाबतच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांच्या पुढाकाराखाली तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी चारा छावणी उभारण्यासाठी सेवाभावी संस्थांना आवाहन केले.
त्याला चुडेखिंडीच्या लोकनेते जयसिंग तात्या शेंडगे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने सकारात्मक प्रतिसाद देत अक्षयतृतीयेला म्हणजेच 7 तारखेला चारा छावणी सुरू केली. पहिल्याच दिवशी 324 जनावरे छावणीमध्ये दाखल झाली. छावणीत 13 मे अखेर 836 जनावरे असून, ही संख्या आणखी वाढत आहे.याबाबत चारा छावणी चालक बापू संभा पाटील म्हणाले, शासनाच्या आदेशाप्रमाणे मोठ्या जनावरांना 18 किलो व लहान जनावरांना 9 किलो चारा वाटप व चांगल्या प्रकारचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच, मोठ्या जनावरांना 1 किलो पशुखाद्य व लहान जनावरांना अर्धा किलो पशुखाद्य असे आठवड्यातून तीन वेळा वाटप चालू आहे. या चारा छावणीचा चुडेखिंडी, जांभूळवाडी आणि चोरोची या तिन्ही गावांना चांगला लाभ होत आहे.पशुपालक समिती सदस्य जगन्नाथ संत्राम पाटील म्हणाले, चारा, पाणी वाटपावर पशुपालक समिती लक्ष ठेवून आहे. या छावणीमुळे दुष्काळ भागातील जनावरे वाचली आहेत. लाभार्थी हिराबाई भुसनर म्हणाल्या, चारा छावणी सुरू झाल्यामुळे जनावरांची सोय झाली आहे. आमची पाच जनावरे या छावणीत आहेत. जनावरांना चारा वाटप व पाणी चांगले मिळते याबद्ल त्यांनी समाधान व्यक्त केले.लाभार्थी विजय संगाप्पा शितोळे म्हणाले, संस्था अतिशय व्यवस्थितरित्या चारा, पाणी, उच्च प्रतीचे पशुखाद्य देण्याचे काम करत आहे. फक्त छावणी म्हणून नाही तर सामाजिक बांधिलकी म्हणून संस्थेने काम केले आहे. ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली आहे. शिवाय प्रशासनातर्फे पशु विभाग जनावरांची तपासणी व आरोग्य विभाग जनावरांबरोबर राहिलेल्या लोकांची तपासणी वेळोवेळी येवून करतात. एकूणच कवठेमहांकाळ तालुक्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने उचललेल्या या पावलाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.