सांगली: शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागातर्फे राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबिर घेतले जाणार आहे. ५ मे ते ६ जून या कालावधीत हा उपक्रम राबविला जाईल.
या खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या-त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री शिबिराचे उदघाटन करतील. विविध अभ्यासक्रम व शिक्षणक्रमांच्या प्रवेश परीक्षांची सचित्र माहिती यामध्ये दिली जाईल. अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा व प्रवेश प्रक्रियेची माहिती देणारी व्याख्यानेही होतील. आयटीआय, अभियांत्रिकी, कौशल्य विद्यापीठ, शैक्षणिक कर्ज व शिष्यवृत्ती, रोजगार व स्वयंरोजगार, स्थानिक शैक्षणिक संस्थांची माहिती, परदेशातील उच्च शिक्षण याचीही माहिती मिळेल.
या उपक्रमांतर्गत सांगलीत ५ मे रोजी माधवनगर रस्त्यावरील डेक्कन हाॅलमध्ये सकाळी साडेनऊ वाजता शिबिर होईल. पालकमंत्री सुरेश खाडे, सहायक आयुक्त ज. बा. करीम, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एम. डी. जोशी उपस्थित राहणार आहेत. तज्ज्ञ संदीप पाटील, हर्षल पाटील, ऋषिकेश जाधव, प्रवीण बनकर, निशा पाटील मार्गदर्शन करतील. प्राचार्य व्ही. बी. देशपांडे, उपप्राचार्य एम. एस. गुरव, शहाजी पाटील, शिवाजी गोसावी, जी. एम. दंडगे, आर. व्ही माळी आदींनी संयोजन केले आहे.
उष्माघातामुळे उन्हात शिबिर नकोसध्या उन्हाची तीव्रता वाढलेली असल्याने भर उन्हात दुपारी बारा ते चार या वेळेत शिबिर घेऊ नये असेही आदेश देण्यात आले आहेत. सकाळी अकराच्या आता किंवा दुपारी चारनंतर शिबिर घ्यायचे आहे. शिबिरस्थळी विद्यार्थ्यांसाठी पाणी, रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यास सांगितले आहे.