इस्लामपूर : येथे गुरुवारी शासनाच्या विसाव्या छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली. उद्घाटनाच्या पहिल्याच सामन्यात यजमान सांगलीने अहमदनगर संघावर ४६-२७ गुणफरकाने विजय नोंदवत क्रीडा रसिकांची मने जिंकली.
येथील नगरपालिकेच्या जयंत पाटील खुल्या नाट्यगृहाच्या मैदानावर या स्पर्धेला प्रारंभ झाला. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याहस्ते औपचारिक उद्घाटन झाले. त्यापूर्वी पंचायत समितीपासून सहभागी संघातील खेळाडूंची शोभायात्रा काढण्यात आली. क्रीडानगरीत या खेळाडूंचे आगमन फटाक्यांच्या आतषबाजीने करण्यात आले. शिवछत्रपती पुरस्कार विजेते नितीन मदने यांनी खेळाडूंना शपथ दिली.उद्घाटनावेळी खोत म्हणाले की, इस्लामपूरची ओळख क्रीडा नगरी म्हणून आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, क्रीडामंत्री विनोद तावडे, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज चषक स्पर्धेच्या आयोजनाचा या क्रीडानगरीला सन्मान मिळाला.
यावेळी आ. शिवाजीराव नाईक, राज्य कबड्डी संघटनेचे कार्यवाह आस्वाद पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार दिनकर पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष रामभाऊ घोडके, जिल्हा क्रीडाधिकारी माणिक वाघमारे, माजी आ. भगवानराव साळुंखे, नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते राहुल महाडिक, विक्रम पाटील, दि. बा. पाटील, सागर खोत, सुनील खोत यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनाच्या पहिल्या सामन्यात सांगलीच्या संघाने अहमदनगरला ४६-२७ अशा गुणफरकाने धूळ चारली. कर्णधार नितीन मदने, राहुल वडार यांच्या आक्रमक चढायांनी नगर संघावर दबाव कायम ठेवला. पहिल्या तीन मिनिटातच लोण देत सांगलीने आघाडी घेतली. इतर सामने मैदानावर दव पडत असल्याने थांबविण्यात आले. हे सामने आज, शुक्रवारी सकाळी खेळवले जाणार आहेत.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील, राज्य व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष सुधीर पिसे, पंच प्रमुख अजित पाटील, पोपट पाटील, मीनानाथ धानजी, प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रवींद्र सरनोबत, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे उपस्थित होते.इस्लामपूर येथे सुरू झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सलामीच्या सामन्यात सांगलीच्या नितीन मदने याने अहमदनगर संघाच्या क्षेत्ररक्षणात केलेली चढाई.