सांगली : महापौर व उपमहापौर पदाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करतेवेळी घड्याळाचे काटे फिरवून केलेली भानगड आता मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली आहे. नगरसेविका स्वरदा केळकर आणि युवराज बावडेकर यांनी यासंदर्भात रविवारी कोल्हापूर येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तशी तक्रार केली. पुराव्यासह लेखी तक्रार केल्यास याप्रकरणी चौकशी केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिले. केळकर यांनी तक्रारीत म्हटले आहे की, काँग्रेसचे महापौर पदाचे उमेदवार हारूण शिकलगार व उपमहापौर पदाचे उमेदवार विजय घाडगे यांनी त्यांचे अर्ज वेळेत दाखल केलेले नव्हते. त्यांच्या समर्थकांनी घड्याळाचे काटे फिरवून वेळेत बदल केला असल्याने, त्यांचे अर्ज रद्दबातल ठरविणे गरजेचे होते. याबाबत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीसोबत अर्ज दाखल करतेवेळीची व्हिडीओ क्लीपही सादर करण्यात आली होती. तरीही त्याची दखल घेतली गेली नाही. पुराव्यांकडे दुर्लक्ष करून तक्रारदारांच्या विरोधातच निर्णय देण्यात आला. महापौर, उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती. शिकलगार व घाडगे यांनी सव्वापाच वाजता अर्ज दाखल केले आहेत. याबाबतची व्हिडीओ क्लीप आहे. त्यात स्पष्टपणे नगरसेविकापुत्र मंगेश चव्हाण घड्याळाचे काटे फिरवित असल्याचे दिसून येत आहे. घड्याळाचे काटे फिरवून पुन्हा ते भिंतीवर लावण्यात आले.शासकीय इमारतीत येऊन निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप झाला आहे, त्यामुळे या दोघांचेही अर्ज रद्द करावेत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. इतका मोठा पुरावा सादर करूनही त्याची दखल घेतली गेली नसल्याने, रविवारी केळकर यांनी कोल्हापुरात जाऊन मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. त्यांच्याकडेच नगरविकास खाते असल्याने त्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश द्यावेत, निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप खपवून घेतल्याप्रकरणी नगरसचिव चंद्रकांत आडके यांना निलंबित करावे, तसेच जिल्हाधिकाऱ्यांचीही याप्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यामुळे हे प्रकरण आता आणखी गाजण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)निवडीला वादाचे ग्रहणमहापौर निवडीला आता वादाचे ग्रहण लागले आहे. पक्षांतर्गत वाद, राजकीय संघर्ष आणि कुरघोड्यांचे राजकारण थांबल्यानंतर आता बेकायदेशीर प्रक्रियेचा वाद थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात गेला आहे. महापौर, उपमहापौर निवडी रद्द करण्याची मागणी नगरविकास खात्यापर्यंत पोहोचली असल्यामुळे, हे ग्रहण आता लवकर सुटण्याची चिन्हे नाहीत. ‘स्वाभिमानी’चा एकाकी लढास्वाभिमानी आघाडीने निवड प्रक्रियेविरोधात चालविलेला लढा एकाकी ठरत आहे. राष्ट्रवादीने यासंदर्भात कोणतीही तक्रार केलेली नाही. कोणी सोबत आले नाही तरी, हा प्रश्न तडीस नेण्याचा निर्धार स्वाभिमानी आघाडीच्या नगरसेवकांनी केला आहे. जनहित याचिकाहीमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतरही याप्रकरणी आपण जनहित याचिका दाखल करणार असल्याचे केळकर यांनी स्पष्ट केले. कायदा पायदळी तुडविणाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असे त्या म्हणाल्या. याप्रकरणी केळकर यांना पुराव्यासह तक्रार सादर करण्याची सूचना दिली. तक्रार प्राप्त होताच तातडीने चौकशीचे आदेश देण्यात येतील व वस्तुस्थिती तपासून कारवाईबाबत पावले उचलली जातील, असेही ते म्हणाले.
घड्याळाची ‘भानगड’ मुख्यमंत्र्यांच्या कानी
By admin | Published: February 08, 2016 1:18 AM