मिरज : मिरजेत बसेसच्या गैरसोयीबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या छायाचित्राला काळे फासल्याने शिंदे व ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांनी दोन्ही गटाना रोखले. याप्रकरणी ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्याना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लाडकी बहीण कार्यक्रमास जाण्यासाठी गुरुवारी मिरजेतून २० बसेस कोल्हापूरला पाठविण्यात आल्या. यामुळे मिरज स्थानकात बसेसचा तुटवडा होऊन प्रवाशांची गैरसोय होत असल्याची तक्रार करीत शिवसेना ठाकरे गटाने बसस्थानकात आंदोलन केले. यावेळी प्रवाशांची गैरसोय केल्याबद्दल बसेसवर लावलेल्या मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री फलकांच्या छायाचित्राला काळे फासून निषेध करण्यात आला. याची माहिती मिळाल्यानंतर शिंदे गटाचे पदाधिकारी तेथे आले. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या चित्राला लावलेले काळे पुसताच दोन्ही गट भिडले. पोलिसांनी मध्यस्थी करीत त्यांना रोखले. ठाकरे गटाचे पदाधिकारी चंद्रकांत मैगुरे, किरण कांबळे, महादेव हुलवान, आनंद रजपूत शाकिरा जमादार यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत शिंदे गटाचे पदाधिकारी पोलिस ठाण्यात बसून होते.
Sangli: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला काळे फासले, मिरजेत शिंदे-ठाकरे गटात राडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 3:35 PM