अविनाश कोळी
सांगली : शिवसेनेचे सांगली शहरप्रमुख महेंद्र चंडाळे यांच्यासह सांगलीतील पाच पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पदांचे राजीनामे देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. महाविकास आघाडीच्या काळात अन्याय झाल्याचे मत चंडाळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगली दौऱ्यावर आले असून ते सांगलीत पोहचण्याआधीच शिवसेनेला धक्का दिला.चंडाळे यांच्यासह उपशहरप्रमुख संदीप ताटे, विभाग प्रमुख सारंग पवार, अल्पसंख्यांक सेना जिल्हाप्रमुख नईम शेख, युवासेना शहर प्रमुख रोहन वाल्मिकी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी चंडाळे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती, गोरगरिब जनतेसाठी सुरु असलेली धडपड तसेच शिवसैनिकांच्या मदतीला धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव यामुळे आम्ही त्यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून शिंदे यांची वाटचाल सुरु आहे. त्यांना बळ देण्यासाठी व गोरगरिबांची कामे व्हावीत म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करीत आहोत.सांगलीत अनेक वर्षे शिवसेनेत प्रामाणिकपणे काम केले. महापालिकेच्या पोटनिवडणुकीत मला उमेदवारी मिळाली असली तरी ती विजयासाठी होती की माझा बळी देण्यासाठी होती, अशी शंका कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. पक्षात राहून विशेषत: महाविकास आघाडीच्या काळात अन्याय झाला. कोणतीही विकासकामे झाली नाहीत. शहरातील आमचा मोठा गट शिंदे गटात जात आहे, असे त्यांनी सांगितले.