सांगली : राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्र्यांचा ‘लायेबल चमचा’ असे संबोधून मुख्यमंत्र्यांचाच अपमान केला आहे. मंत्रिमंडळातील एक सदस्य थेट मुख्यमंत्र्यांवर टीका करताना, त्यांना नारळ देणे अपेक्षित असताना ते धाडस मुख्यमंत्र्यांमध्ये नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांमध्ये ताकद असेल, तर त्यांनी जानकरांना घरी घालवावे, असे आव्हान राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिले. ते म्हणाले की, भगवानगडाच्या पायथ्याशी झालेल्या सभेत जानकर यांनी खालच्या पातळीवर येऊन भाष्य केले. जानकर धनगर समाजाला आरक्षण देऊ शकत नसल्याने त्यापासून लक्ष वळवण्यासाठीच त्यांनी टीका केली. राज्य सरकारचा कारभार संथ गतीने सुरू असून, अगदी अधिकारीही मंत्र्यांना जुमानत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्य कारभारावरून लक्ष विचलित करण्यासाठी मंत्रिमंडळातील मंत्री राष्ट्रवादीच्या नेत्यांवर पातळी सोडून टीका करत आहेत. ते म्हणाले की, जानकर यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर असभ्य भाषेत टीका केली. जानकरांचे आसन डळमळीत झाल्यानेच ते असे बोलले. धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना तर त्यांनी मर्यादा ओलांडत अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवरही टीका केली. मुख्यमंत्र्यांनी चमचे ठेवले आहेत, असा मंत्रिमंडळातील एक सदस्य म्हणत असताना, त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात नाही. कारण राज्यातील मंत्री, कर्मचारीही त्यांचे ऐकत नाहीत, हे सत्य आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांत ताकद असेल, तर त्यांनी जानकरांना घरी घालवावे, असे आव्हान आ. पाटील यांनी दिले. (प्रतिनिधी)मराठा समाजाला आरक्षण : सरकारची टाळाटाळमराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावरून न्यायालयाने सरकारला फटकारले आहे. मुळात सरकारकडूनच मराठा समाजाला आरक्षण देण्यास टाळाटाळ होत आहे. सरकारचा सरळसरळ वेळकाढूपणा सुरू असून, त्यांना आरक्षण द्यायचेच नसल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी जानकरांना घरी घालवावे
By admin | Published: October 14, 2016 1:05 AM