लोकमत न्यूज नेटवर्कऔंध : ‘जलयुक्त शिवार व वॉटरकप स्पर्धेतील कामांमुळे येत्या दोन-तीन वर्षांत संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार आहे, ’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. दरम्यान, कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री निघाले असता निवेदकांनी सर्वांना ‘माझ्यामागे पाणी फाउंडेशनच्या घोषणा द्या,’ असे म्हटल्यावर मुख्यमंत्री स्वत: जागेवरच थांबले व ‘अन्न गुडगुडे, नाल गुडगुडे’ म्हटल्याबरोबर सर्वांच्या बरोबर त्यांनी हात वर करून ‘डिशक्यांव-डिशक्यांव- डिशक्यांव’ असे तीनवेळा म्हणत उपस्थितांची मने जिंकली. वॉटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या पवारवाडी, ता. कोरेगाव येथे जलसंधारणाच्या कामाची पाहणी दौऱ्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहपालक सदाभाऊ खोत, विभागीय आयुक्त चंद्र्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, उपवनसरक्षक अनिल अंजनकर, सरपंच राजेंद्र पवार व पाणी फाउंडेशनचे विविध पदाधिकारी, कृषी अधिकारी, वनअधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.मुख्यमंत्री म्हणाले, ‘प्रत्येकाने आपलं गाव जलयुक्त झाले पाहिजे, आपल्या जमिनीत पडणाऱ्या पावसाचे पाणी अडले पाहिजे, यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. पवारवाडीसारख्या छोट्या गावाने केलेले काम अतिशय उत्तम असून, वॉटरकप स्पर्धेतील पुरस्काराच्या दृष्टीने आपण मजबूत उमेदवार आहात, यात काही शंका नाही. माथ्यापासून पायथ्यापर्यंत जलयुक्तच्या माध्यमातून कामे सुरू आहेत. यामध्ये नुसते पाणी अडत नाही तर पाणीही थांबते व मातीही थांबते. काही लोकांना असे वाटते की ओढा, नाला खोलीकरण, रुंदीकरण केले आणि सिमेंट नालाबांध घातला की यामुळे जलसंधारण होते. असे काही होत नसून जलयुक्तच्या कामामुळे समतल चर, डीपसीसीटी, एलबीएस अशा अनेक प्रकारे पाणीही अडते व मातीही थांबते.’दरम्यान, खोलीकरण आणि रुंदीकरण याकरिता करण्यात आलेल्या कामाच्या खर्चाचा १ लाख ९३ हजारांचा चेक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पवारवाडी सरपंच व ग्रामस्थांना देण्यात आला.ढोल-ताशांच्या गजरात स्वागतमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत पवारवाडीच्या विद्यार्थिनींनी मराठमोळ्या वेशभूषा परिधान करून ढोल-ताशांच्या गजरात केले. पवारवाडी ग्रामस्थांनी आतापर्यंत केलेल्या समतल चर, डीपसीसीटी, एल.बी.एस, दगड बांध, विहीर पुनर्भरण, रुंदीकरण, खोलीकरण, मोठा माती बांध, ठिबक सिंचन आदी केलेल्या कामाचा नकाशा मुख्यमंत्र्यांनी बारकाईने पाहिले. यानंतर त्यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांचं डिशक्यांवऽऽ डिशक्यांवऽऽ !
By admin | Published: May 19, 2017 11:29 PM