मिरज : महाजनादेश यात्रेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिरजेत केवळ दीड मिनिटाची भेट दिली. मात्र या दीड मिनिटाच्या भेटीने दोन दिवस जनजीवन विस्कळीत झाले. सोमवारी दिवसभर विद्युतपुरवठा खंडित केल्याने बहुतांशी रुग्णालयांतील शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या. परिणामी रुग्णांची मोठी गैरसोय झाली.महाजनादेश यात्रेतील वाहनांची उंची जास्त असल्याने वीज वितरण विभागाने अनेक ठिकाणी रस्त्यावरील विजेच्या तारा तोडल्याने अनेक रुग्णालयात तपासण्या व शस्त्रक्रिया थांबल्या. सोमवारी आठवड्याच्या पहिल्यादिवशी मिरजेतील बहुतांशी रुग्णालयात रुग्णांची गर्दी असते. मात्र यात्रेची माहिती नसल्याने परगावहून आलेल्या रुग्णांची गैरसोय झाली. मिरजेतील मिशन हॉस्पिटल, मिरज शासकीय रुग्णालय, सिध्दिविनायक कॅन्सर हॉस्पिटल, सेवासदन हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल या मोठ्या हॉस्पिटल्ससह अन्य रुग्णालये गांधी चौक व मिरज-सांगली मार्गाशेजारी आहेत. या भागातीलच विजेच्या तारा तोडल्याने वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे हॉस्पिटलमधील रुग्णांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या. काही रुग्णालयात जनरेटर भाड्याने आणून तातडीच्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. मंगळवारी दुसऱ्या दिवशीही अनेक भागात वीज तारा जोडण्याचे काम सुरू होते. सोमवारी रात्रीपर्यंत अर्धे शहर अंधारात होते.मुख्यमंत्र्यांच्या रथाची उंची अधिक असल्याने रस्त्यावरील विजेच्या तारा, झाडे तोडण्यासाठी महापालिका व महावितरण कर्मचाऱ्यांची दोन दिवस धावपळ सुरू होती. महाजनादेश यात्रेसाठी सोमवारी दुपारी एकपासून मिरज-सांगली रस्ता बंद करण्यात आल्याने या मार्गावरुन येणाºया वाहनधारकांचे हाल झाले. पंढरपूर व सांगली रस्त्यावरील विजेच्या तारांसोबत केबलच्या ताराही तोडून टाकण्यात आल्या. यामुळे मंगळवारी सायंकाळपर्यंत शहरातील केबल प्रक्षेपण बंद होते. गांधी चौकातील दुकाने सोमवारी दिवसभर बंद होती.वीज खंडित असल्याने पंढरपूर रस्ता व सांगली रस्त्यावरील राष्ट्रीयीकृत बँकेतील व्यवहार ठप्प होते. अनेक ठिकाणी झाडे तोडली. एवढे करूनही मिरजेला मुख्यमंत्र्यांनी केवळ दीड मिनिटाचा वेळ दिला. मिरजकरांशी ना संवाद साधला, ना भाजप कार्यकर्त्यांशी हितगूज केले. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दीड मिनिटाच्या यात्रेने मिरजेत जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:41 PM