लिंगनूर : कदमवाडी (ता. मिरज) येथील गावात चिकुनगुन्या, डेंग्यूची साथ पसरली आहे. परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने गावातील प्रशासनाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब जाधव, अशोक चव्हाण यांनी केली आहे.
कदमवाडीत गेल्या आठवड्यापासून चिकुनगुन्या, डेंग्यूची साथ पसरली आहे. दोन दिवसांत चिकुनगुन्याचे ५० पेक्षा अधिक रुग्ण व ५ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे थंडी, ताप येऊन स्नायू दुखण्याच्या त्रासाने नागरिक हैराण झाले आहेत. गावभाग परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, गटारी तुंबल्याने दुर्गंधी येत आहे. गावात डासांचा उपद्रव वाढल्याने ही साथ पसरली आहे. चिकुनगुन्या, डेंग्यूची लागण झालेले रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र गावात आरोग्य विभागाचे कर्मचारी फिरकले नाहीत. तसेच गावात साथ आटोक्यात आणण्यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे कदमवाडी येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.