ऐतवडे बुद्रुक ल्ल शंकर शिंदेचिकुर्डे (ता. वाळवा) जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण खुला व जिल्हा परिषद अध्यक्षपदही खुले असल्यामुळे, येथे इच्छुकांची रेलचेल मोठ्या प्रमाणात दिसत आहे. राष्ट्रवादी विरुध्द विकास आघाडी अशाच लढतीची शक्यता आहे. मतदार पुनर्रचना कोणाला फायद्याची ठरणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.या मतदार संघात शिवसेना नेते व माजी जि. प. सदस्य अभिजित पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. ते विकास आघाडीतून लढणार, की शिवसेनेच्या चिन्हावर, ते अजून स्पष्ट झालेले नाही. हे आघाडीच्या बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहेत. राष्ट्रवादीतून अभिजित पाटील यांचे कट्टर विरोधक राजारामबापू दूध संघाचे संचालक सोमराज देशमुख यांचे नाव घेतले जात आहे. परंतु ते स्वत: इच्छुक नाहीत. त्यामुळे अंतिमक्षणी आमदार जयंत पाटील यांच्या निर्णयावरच, कोण उमेदवार द्यायचा ते ठरणार आहे.राष्ट्रवादीतूनच आनंदराव सरनाईक (फौजीबापू) यांचे नाव आघाडीवर आहे. राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांचे पुत्र बाळासाहेब पाटील (कुरळप), प्रताप पाटील (ऐतवडे खुर्द), राजारामबापू सूतगिरणीचे संचालक दिलीप खांबे (चिकुर्डे) यांचीही नावे चर्चेत आहेत. मनसेकडून विजय भालकर (कुरळप) यांनी अगोदरच उमेदवारी जाहीर करुन टाकली आहे. विकास आघाडी किंवा भाजपमधून ‘शिवाजी केन’चे संचालक शहाजी पाटील यांचाही विचार सुरू आहे.चिकुर्डे पंचायत समिती गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धडाडीचे कार्यकर्ते व शिवाजी केनचे संचालक अनिल पाटील यांच्या पत्नी आशा अनिल पाटील (ऐतवडे खुर्द), राष्ट्रवादीमधून सौ. मनीषा अशोक पाटील, सौ. मनीषा रणजित पाटील, सौ. नीतांजली संभाजी पाटील, सौ. उज्ज्वला महिंद्र पाटील आदी उमेदवार इच्छुक आहेत.कुरळप पंचायत समिती गण सर्वसाधारण गटासाठी खुला आहे. त्यामुळे येथून पी. आर. पाटील यांचे पुत्र बाळासाहेब पाटील (कुरळप), पी. टी. पाटील (वशी), विकास आघाडी किंवा भाजपमधून सुनील पाटील (कुरळप), सुनील पाटील (लाडेगाव), व्ही. टी. पाटील, तसेच स्वप्नील पाटील (वशी) यांचे नाव चर्चेत आहे.या मतदार संघात काँग्रेसची भूमिका काय राहणार, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी या मतदारसंघात चिकुर्डे व कुरळप हे दोन पंचायत समिती मतदारसंघ होते. चिकुर्डे मतदार संघातून ऐतवडे बुद्रुक येथीलच उमेदवारी निश्चित असायची. परंतु ही गावे पूर्णपणे वगळली आहेत. यापूर्वी चिकुर्डे जिल्हा परिषद गटामध्ये चिकुर्डे, ऐतवडे बुद्रुक, ठाणापुडे, डोंगरवाडी, शेखरवाडी या गावांचा समावेश होता, तर कुरळप पंचायत समितीमध्ये कुरळप, वशी, लाडेगाव, देवर्डे, करंजवडे ही गावे होती. नवीन पुनर्रचनेत चिकुर्डे पंचायत समिती गणात चिकुर्डे, ऐतवडे खुर्द, देवर्डे, तर कुरळप पंचायत समिती गणात कुरळप, वशी, लाडेगाव व इटकरे या गावांचा समावेश आहे. कमी झालेल्या ऐतवडे बुद्रुक, ठाणापुडे, शेखरवाडी, डोंगरवाडी, करंजवडे व वाढलेल्या ऐतवडे खुर्द व इटकरे या गावांचा कोणाला फटका बसणार व कोणाला फायदा होणार, हे मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे. त्याचा अद्याप अंदाज लागणे कठीण आहे. राष्ट्रवादीमधून कोण उमेदवार असणार, हे आमदार जयंत पाटील यांच्या आदेशानंतर निश्चित होईल. शिवसेना, भाजप व स्वाभिमानीसह इतरांची विकास आघाडी निश्चित मानली जात आहे. यामधून शिवसेना नेते अभिजित पाटील (आबा) यांची उमेदवारी निश्चित आहे. मात्र नेहमी चर्चेत असणारे सोमराज देशमुख (बाबा) यांची भूमिका काय राहणार, आबा व बाबा यांची पारंपरिक टक्कर होणार का, याकडे लक्ष लागले आहे.
चिकुर्डेत इच्छुकांच्या गर्दीने वाढली चुरस
By admin | Published: January 01, 2017 10:57 PM