सांगली : मिरज पूर्व भागात एक गावातील दीड वर्षाच्या बालकाला स्वाइन फ्ल्यूची लागणी झाली आहे. तसा अहवाल जिल्हा आरोग्य विभागाला सोमवारी प्राप्त झाला. संसर्ग झालेल्या बालकावर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बालकाची प्रकृती चांगली आहे.सोमवारी एका बालकाला स्वाइन फ्ल्यूची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली. या बालकास ताप आल्यामुळे २८ जून रोजी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतरही ताप कमी होत नसल्याने डेंगी, स्वाइन फ्ल्यूसह अन्य काही चाचण्या करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानुसार करण्यात आलेल्या चाचणीचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यात बालकास स्वाइन फ्ल्यूची लागण झाल्याचे म्हटले आहे. सध्या त्याची प्रकृती चांगली असल्यामुळे एक ते दोन दिवसांत घरी सोडण्यात येणार आहे.
बालकाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. ते राहत असलेल्या परिसरात सोमवारी तातडीने सर्वेक्षण करण्यात आले. अन्य कोणत्याही व्यक्तीमध्ये स्वाइन फ्ल्यूची लक्षणे आढळून आली नाहीत. आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून बालकाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना स्वाइन फ्ल्यूूच्या अनुषंगाने प्राथमिक उपचार सुरू केले आहेत. कोणीही घाबरू नये, मात्र लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
आरोग्य विभाग सतर्कगेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांत स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण सापडत आहेत, मात्र जिल्ह्यात आतापर्यंत या स्वाइन फ्ल्यूचा एकही रुग्ण नव्हता.
मिरज पूर्व भागातील बालकाला स्वाइन फ्ल्यूूची लागण झाली आहे. त्याची प्रकृती चांगली आहे. कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही. लक्षणे दिसल्यास जवळच्या आरोग्य केंद्रांत चाचणी करावी. - डॉ. विजयकुमार वाघ जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.