प्रदीप पोतदारकवठे एकंद : लग्न समारंभ म्हटला की धार्मिक विधी, रूढी-परंपरा, मानपान अशा अनेक चालीरिती पाहायला मिळतात. ग्रामीण भागात तर परंपरा पाळल्या जातातच. परंतु, आपल्या एकुलत्या एक मुलाच्या लग्नाची सुरुवात ग्राम स्वच्छतेच्या माध्यमातून करून सामाजिक कार्यकर्ते प्रदीप माळी व कुटुंबीयांनी सामाजिक संदेशाची मुहूर्तमेढच रोवली.दारूबंदी व्यसनमुक्ती कार्यात नेहमी अग्रेसर असणारे कवठे एकंदचे प्रदीप रानबा माळी हे छत्रपती संभाजीनगर येथे नोकरीनिमित्ताने वास्तव्यास आहेत. त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने गावाकडे आल्यावर परिसरातील गरज लक्षात घेऊन गल्लीतील गटार स्वच्छतेची मोहीमच हाती घेतली. परिसर स्वच्छ, चकचकीत केला.मोठ्या शहरात राहूनही कवठे एकंद गावाशी त्यांची नाळ कायम जोडलेली आहे. नोकरीबरोबरच तंबाखूजन्य पदार्थविरोधी व्याख्यान जनजागृती, एकांकिका, पथनाट्य, समुपदेशन अशा उपक्रमांतही माळी यांचा हिरिरीने सहभाग असताे. व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी त्यांनी शेकडो व्याख्याने राज्यभरात दिली आहेत. त्यांच्या सामाजिक कामाबद्दल महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्ती कामाचा आदर्श पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. त्यांच्या पत्नी लता माळी याही समाजकार्याला हातभार लावतात.
मुलाच्या लग्नाची धांदल व लगबग सुरू असतानादेखील सामाजिक कामाची तळमळ जागृत ठेवत माळी यांनी ग्राम स्वच्छता कामाने लग्नाची मुहूर्तमेढच रोवली. तर लग्नाच्या निमित्ताने शेकडो रोपांची लागण करण्याचा मानस व्यक्त केला. गटार व परिसरातील स्वच्छतेसाठी विजय, राजू, दिलीप, अरविंद, पांडू, सुनील, अविनाश माळी या युवकांचे सहकार्य लाभले. माळी कुटुंबीयांचा हा स्वच्छतेचा पायंडा समाजात सामाजिक भान जोपासण्यास प्रेरणा देणारा ठरला आहे.
छोट्या-मोठ्या सामाजिक कामातून आनंद काही औरच असतो. दैनंदिन कामकाज, नोकरी यातून मिळणारा वेळ व्यसनमुक्तीसाठी, समाजकार्यासाठी देण्याची सवय लागली आहे. या कामातून प्रेरणा मिळते. - प्रदीप माळी, कवठे एकंद