संख : कुलाळवाडी (ता. जत) येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील मुला-मुलींमध्ये समानता यावी. भेदभाव कमी व्हावा. पुरुषांना स्वयंपाक करता यावा. या उद्देशाने मुलांनी ‘माझी भाकरी’ उपक्रम राबविला. याअंतर्गत भाकरी बनविण्याच्या स्पर्धेत ९० मुलांनी सहभाग नोंदवला.कुलाळवाडी गावातील ७० टक्के लोक ऊसतोडणीसाठी सहा महिने स्थलांतर करतात. मुलांना अर्धवट शिक्षण सोडून आई- वडिलांसोबत जावे लागते. आई- वडील गेले, तर मुलांत आत्मविश्वास निर्माण व्हावा. मुलांना स्वयंपाक करता यावा. या उद्देशाने उपक्रमशील शिक्षक भक्तराज गर्जे यांच्या संकल्पनेतून ‘माझी भाकरी’ हा उपक्रम २०१६ पासून सुरू करण्यात आला.२०१६ पासून शाळेत भाकरी बनवण्याची स्पर्धा सुरू केली. विद्यार्थी घरातून पीठ, तवा, काटवट, जळण हे साहित्य आणून पटांगणावर तीन दगडांची चूल मांडून भाकरी तयार करतात. या स्पर्धेमध्ये भाकरीचा आकार, चव हे निकष लावून नंबर काढला जातो. आजपर्यंत शाळेतील १८२ विद्यार्थी भाकरी बनविण्यास शिकले आहेत.
शाळेची पटसंख्या ८० हून २४० पर्यंत पोहोचली आहे. या उपक्रमामुळं मुलांचं स्थलांतर शंभर टक्के थांबून शाळेची पटसंख्या व उपस्थिती वाढली आहे. स्त्री- पुरुष समानता, समस्या निराकरण, स्वत:च्या समस्यांचं निराकरण ही मूल्यं विद्यार्थ्यांमध्ये विकसित होत आहेत. -भक्तराज गर्जे (शिक्षक)
शाळेत भाकरी बनविताना मला खूप आनंद मिळतो. माझे आई- वडील ऊसतोडीला गेल्यानंतर मी व माझा भाऊ स्वतः स्वयंपाक करून खातो. -बिरुदेव तांबे (विद्यार्थी)
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय अशा छोट्या- छोट्या उपक्रमांद्वारे साध्य होत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शाळेची व अभ्यासाची आवड निर्माण होतेय. -अशोक घोदे, मुख्याध्यापक कुलाळवाडी