सांगली : महिला व बालकल्याण समितीला अंधारात ठेवून नेमिनाथनगर येथील खुल्या भूखंडावर चिल्ड्रन पार्क उभारण्याच्या निर्णयाविरोधात महिला सदस्या आक्रमक झाल्या होत्या. सदस्यांचा विरोध लक्षात घेता, शुक्रवारी स्थायी समितीनेही हा प्रस्ताव फेटाळत, समितीच्या ठरावानंतर त्यावर चर्चा करण्याची भूमिका घेतली.
महापालिका प्रशासनाने नेमिनाथनगर येथील खुल्या भूखंडावर ९१ लाख रुपये खर्चून चिल्ड्रन पार्क विकसित करण्याचा प्रस्ताव स्थायीकडे दिला होता. त्यासाठी महिला व बालकल्याण समितीकडील निधी खर्च केला जाणार होता. काँग्रेसच्या नगरसेविका आरती वळवडे, शुभांगी साळुंखे, नसिमा नाईक यांनी निधी वर्ग करण्यास विरोध करीत, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. महिला व बालकल्याण समितीला अंधारात ठेवून प्रशासनाने निधी पळविल्याचा आरोपही त्यांनी केला होता. गजानन मगदूम यांच्यासह सर्वच सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले, माझ्या प्रभाग १७ मध्ये चिल्ड्रन पार्क होत आहे. त्यामध्ये वॉकिंग ट्रॅक, बालकांसाठी खेळण्यांसह सुसज्ज असे पार्क होईल. पण त्यासाठी महिला- बालकल्याण समितीचा निधी परस्पर खर्च करण्याचा उद्योग प्रशासनाने केला कशासाठी? यातून सदस्यांत मतभेद, भांडणे लावण्याचा प्रशासनाचा उद्योग सुरू आहे का? महिला बालकल्याण समितीच्या मान्यतेनेच त्याचा निर्णय व्हावा. त्यामुळे प्रशासनाचा परस्पर प्रस्ताव सर्वानुमते फेटाळला. शासनाच्या १०० कोटीच्या निधीतून कोल्हापूर रोडवरील जोतिरामदादा सावर्डेकर आखाड्याचे नूतनीकरण व शॉपिंग कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव होता. त्यासाठी १ कोटी ९९ लाख रुपयांची तरतूद केली होती. परंतु तांत्रिक अडचणींमुळे तो प्रस्तावही स्थायी समिती सभेत रद्द करण्यात आला.
चौकट
ठेकेदार काळ्या यादीत
विद्युत साहित्य पुरवठा करण्यासाठी ठेकेदार नियुक्त करण्यात आला होता. वर्षभरात अनेकवेळा सूचना देऊनही त्याने साहित्य पुरवठा केला नाही. अखेर त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा स्थायी समितीत ठराव करण्यात आला.