शीतल पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आजकालची मुले सतत टीव्हीसमोर असतात...मोबाईल पाहण्यात दंग असतात... वाचतात कुठे काय? अशी तक्रार अनेक पालक करतात. त्यावर आयुक्त नितीन कापडणीस यांनी उपाय शोधून काढला आहे. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी महापालिकेच्या पुढाकाराने वाचनकट्टा सुरू करण्याचा संकल्प सोडला आहे. केवळ लहान मुलांसाठीच नव्हे तर मोठ्यांसाठीही वाचनकट्टा सुरू होणार आहे. महापालिकेच्या उद्यानात वाचनकट्टा बहरणार असून त्यादृष्टीने आयुक्तांनी पावले उचलली आहेत.
मुलांचे वाचन कमी झाल्याचे चित्र शहरात आहे. हल्लीची मुले संगणक, मोबाईल, टीव्ही यांच्यात बहुतांश वेळ घालवित असतात. त्यात शहरातील बदलती जीवनशैली, पालकांचा नोकरीत जाणारा वेळ, घरात ज्येष्ठ लोक नसल्याने घरातून वाचनसंस्कृती हद्दपार होत चालली आहे. केवळ लहान मुलांमध्येच नव्हे तर मोठ्यातही हीच स्थिती आहे. युवकांमध्ये तर वाचनाची आवड कमी झाल्याचेच चित्र दिसून येत आहेत. शहरात वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी पुढाकार घेतला आहे. लहान मुलांसोबतच मोठ्यांतही वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.
सध्या मोठ्यांसाठी त्यांनी पुस्तक बँक सुरू करण्याचा संकल्प सोडला आहे. अनेकजण प्रवासात अथवा सुट्टीच्या काळात वाचनासाठी पुस्तके खरेदी करतात. ती वाचून झाल्यावर घरातच पडून राहतात. त्या पुस्तकांचा पुनर्वापर होत नाही. त्यासाठी आयुक्तांनी ही पुस्तके महापालिकेकडे देणगी स्वरुपात आणून द्यावीत, असे आवाहन केले आहे. त्यातून जमा होणारी पुस्तके मोठ्या लोकांना वाचण्यास दिली जाणार आहेत. याच धर्तीवर लहान मुलांसाठीही पुस्तके जमा करण्याचा निर्धार आयुक्त कापडणीस यांनी केला आहे. त्यातून वाचन चळवळ सुदृढ करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
चौकट
उद्यानात वाचनकट्टा
आमराई उद्यानात एक दिवस निश्चित करून या दिवशी पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या दिवशी लहान मुले, मोठ्यांना उद्यानात येऊन निसर्गाच्या सान्निध्यात वाचनाचा आनंद लुटता येईल. त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे.
चौकट
कोट
स्वच्छ सर्वेक्षणात पुनर्वापराबाबत सूचना दिल्या आहेत. त्यातून कोणत्या गोष्टीचे पुनर्वापर होऊ शकतो, याचा विचार करीत असतानाच पुस्तक वाचनाची संकल्पना सुचली. अनेकांच्या घरात पुस्तके पडून असतात. कालातंराने ती खराब होतात अथवा रद्दीत जातात. त्यापेक्षा त्यांचा पुनर्वापर होऊन हे साहित्य लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत पोहोचविण्याचा व त्यांच्या वाचनाची आवड निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.
- नितीन कापडणीस, आयुक्त, महापालिका