उमदी : आसंगी (ता. जत) येथे दोन दिवसांपूर्वी घडलेल्या बालकाच्या मृत्यूच्या घटनेची उकल झाली असून आईनेच आपल्या बाळाचा खून केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी निर्दयी आई संगीता भानुदास गडदे (वय २२) हिच्याविरोधात उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.
मंगळवारी आसंगी येथे संगीता गडदे हिचे सव्वा महिन्याचे मूल विहिरीच्या काठावर मृतावस्थेत आढळून आले होते, तर ती स्वत: विहिरीत पाण्याच्या पाईपला धरून उभी असलेली दिसून आली होती. ही घटना समोर आल्यावर संगीताने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे, तसेच तिच्या बाळाचा कडाक्याची थंडी व भुकेने मृत्यू झाला असावा, असा भास निर्माण झाला होता.घटनास्थळी उमदीचे सहायक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे यांनी पाहणी केली असता, बाळाचा मृत्यू थंडीने अथवा भुकेने झाला नसावा, अशी शंका आली. यामुळे त्यांनी तपासाला गती दिली असता, त्यांना संगीताचा संशय आला. कारण तिला पोहता येते. तसेच तिला आत्महत्याच करायची होती, तर तिने पाईपचा आधार का घेतला? असाही प्रश्न निर्माण झाला. कसून चौकशी केली असता, तिने बाळाच्या खुनाची कबुली दिली.
आसंगी येथील भानुदास गडदे व संगीता यांचा अडीच वर्षापूर्वी विवाह झाला होता. भानुदास हा शेतमजूर आहे. संगीताला गंभीर आजार झाला आहे. त्यामुळे दोघात कौटुंबिक वाद निर्माण होत होते. दोन दिवसांपूर्वी पुन्हा वाद झाला होता. यातून पहाटेच्या सुमारास संगीता बाळासह घराबाहेर पडली आणि गावातील बिरोबा मंदिरासमोर असलेल्या पाण्याच्या बादलीत बाळास बुडवून तिने त्याचा खून केला. त्यानंतर गावाशेजारील तुकाराम टोणे यांच्या शेतातील विहिरीच्या काठावर मृत अवस्थेतील बाळास ठेवून तिने विहिरीत उडी घेतली व आपला जीव जाऊ नये यासाठी विहिरीतच पाईपला धरुन उभी राहिली. शेतमालकाचा मुलगा अरुण याने ग्रामस्थांना ही माहिती दिल्यानंतर संगीताला विहिरीबाहेर काढून उपचारासाठी मिरज येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. आत्महत्येचा बनाव करून तिने बाळाला मारल्याची बाब तपासात पुढे आली.गंभीर आजाराची होती भीतीसंगीता हिला गंभीर आजार आहे. त्यामुळे बाळाचे पुढे कसे होणार? या भीतीपोटी तिने बाळाला मारले असल्याचे कबूल केले, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे यांनी दिली. संगीताला अटक झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण संपागे करत आहेत.