सांगली : उन्हाळ्याची चाहूल लागली की घरोघरी उन्हाळकामांना प्राधान्य दिले जाते. वर्षभरासाठी लागणाऱ्या पापड, शेवया, कुरडईसह इतर पदार्थ तयार केले जातात. मिरची मसाल्यातून चटणी तयार करण्यास सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. मात्र, कोरोनाने बाजारपेठेची घडी बिघडल्याने मिरचीची आवक कमी झाल्याने ग्राहकांना मिरचीसह मसाल्याच्या महागाईचा ठसका सहन करावा लागत आहे.
सांगलीतील बाजारात कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणामधून मिरचीची आवक होते. मात्र, तेथील उत्पादनावरच परिणाम झाल्याने व सगळीकडेच मागणी असल्याने आवक घटली आहे.
उन्हाळ्यात चांगल्या दर्जाची मिरची बाजारात येत असल्याचा अनुभव असल्याने अनेकांनी चटणीचे नियोजन केले होते. मात्र, यंदा मिरचीपासून चटणीसाठी लागणाऱ्या सर्वच घटकांच्या दरात सरासरी ४० ते ८० रुपयांची वाढ आहे. स्थानिक पातळीवरील मिरचीही उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील आठवडी बाजारात मिरची विक्रीस येत असली तरी त्याचा दर आवाक्याबाहेर गेला आहे.
चौकट
आंध्र, तेलंगणामधून मिरचीची आवक
जिल्ह्यात वर्षभर मिरचीची आवक होत असली तरी प्रत्यक्षात जानेवारीपासून आवक वाढत असते. सांगलीतूनही अनेक भागांत मिरची पाठविली जाते. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा भागातून मिरची येत असते. मात्र, यंदा त्या भागात पावसाचे प्रमाण आणि शेतकऱ्यांनी इतर पिकांकडे लक्ष दिल्याने मिरची उत्पादनावरच परिणाम झाला आहे.
चौकट
मिरचीचे दर (प्रति किलाे)
बेडगी साधी २८० ते ३५०
बेडगी अस्सल ४०० ते ४८०
लवंगी २०० ते २५०
स्थानिक २२० ते २७०
चौकट
मसाल्याचे दर (प्रति किलो)
धने १२०
जिरे १५०
तीळ १००
खसखस १४००
खोबरे २२०
मेथी १२०
हळद १३०
मोहरी ९०
अन्य मसाले (प्रति दहा ग्रॅम)
लवंग १५
धोंडफूल २५
बदामफूल २५
वेलदोडे २०
बडीशेप २५
जायपत्री ३०
नाकेश्वर ३०
त्रिफळ १५
गृहिणी म्हणतात...
गेल्या वर्षीही उन्हाळ्याच्या सुरुवातीला कोरोना संसर्गाची भीती असल्याने मिरची करता आली नाही. त्यानंतर यंदा करायची म्हणून थोडीच केली होती, मात्र या वेळी वाढलेले दर बघता, चटणी आम्हाला खरीच तिखट लागणार आहे.
- छाया ढवळे, गृहिणी
कोट
वर्षभरासाठी चटणी पुरेल यासाठी एकाच वेळी जादा मसाल्याची खरेदी केली जाते. गेल्या वर्षीपेक्षा या वेळी सगळ्याच पदार्थांचे दर वाढले आहेत. पण नाइलाज असल्याने महागाई असली तरीही जादा नाही, पण थोडी तरी का होईना चटणी करावीच लागणार आहे.
- जयश्री लुगडे, गृहिणी