सांगली : घरासाठी चटणीची वर्षभराची जुळणी करण्याचा गृहिणींचा हंगाम लॉकडाऊनमध्येच संपण्याची चिन्हे आहेत. ग्रामीण भागात आठवडा बाजार बंद असल्याने मिरची व मसाला मिळणे मुश्किल झाले आहे. सांगली बाजारात मोजकाच साठा उपलब्ध आहे. वाहतुकीअभावी नवी आवक बंद असल्याने मसाला भाव खाऊ लागला आहे.
मिरचीचे दर स्थिर आहेत, मात्र मसाल्याच्या किमती २० ते ३० टक्क्यांनी भडकल्या आहेत. मिरची व मसाल्याचा बाजार जानेवारीपासून जूनपर्यंत चालतो. नेमके हेच दिवस कोरोनाच्या थैमानात सापडले आहेत. सध्या सांगलीत बाजार समितीतील घाऊक व्यापाऱ्यांकडे जेमतेम उलाढाल सुरु आहे. गेल्यावर्षीपेक्षा ५० ते ७० टक्क्यांनी ग्राहक घटल्याचे घाऊक व्यापारी विजय पाटील यांनी सांगितले.
सांगली शहर व पंचक्रोशीतील गावांमधूनच गरजू ग्राहक येत आहेत. सकाळी सात ते अकरा या मोजक्या वेळेतच थोडीफार उलाढाल होत आहे. बाजार समितीतून वर्षभर जिल्ह्यातील घाऊक व किरकोळ व्यापारी मिरची व मसाला नेतात. यंदा वाहतूक बंद असल्याने हा ग्राहक अडकून पडला आहे.
येथून येतो मिरची व मसाला...सांगली बाजारपेठेत मुंबई, गुजरात, केरळ येथून मिरची व मसाल्याची आवक होते. वाहतूक बंद असल्याने नवी आवक थांबली आहे. माल उतरवून रिकामे परतणे परवडत नसल्यानेही वाहने यायला तयार नाहीत. त्यामुळे शीतगृहातील मिरचीवरच बाजार समितीतील दुकाने सुरु आहेत. तेथील साठा संपला की, जिल्ह्यात मिरचीची टंचाई निर्माण होईल.
असा आहे मिरची बाजार...गतवर्षीच्या तुलनेत यंदा मिरची फार महागलेली नाही. ग्राहक नसल्याचाही हा परिणाम असावा. देशी व संकेश्वरी मिरची १५० ते १७० रुपये किलोने विकली जात आहे. यातील चांगल्या दर्जाची मिरची २०० रुपये किलोने उपलब्ध आहे. गुंटूर १३० ते १६० दरम्यान आहे. ब्याडगी मिरची मात्र भाव खात असून तिला प्रतीनुसार २०० ते ३५० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. हे सर्व दर घाऊक बाजारातील असून पाच टक्के जीएसटी व तीन टक्के अडत जादा द्यावी लागते. जिरे, मोहरी, धने, ओवा हा मसाला प्रामुख्याने गुजरातहून येतो. त्यांचे दर २० ते ३० टक्क्यांनी भडकले आहेत. केरळहून येणारी मिरी, दालचिनी, खोबरे, तमालपत्र यांची नवी आवक बंद असल्याने दरवाढ झाली आहे.
मिरची व मसाल्याचा अर्धा हंगामा लॉकडाऊनमध्येच संपला आहे. संचारबंदीमुळे जिल्हाभरातील ग्राहक सांगलीला फिरकला नाही. दरवर्षीपेक्षा २५ टक्केही उलाढाल झालेली नाही. नवी आवक नसल्याने दरवाढ झाली आहे.- विजय पाटील, घाऊक व्यापारी, सांगली