सांगली : मालवाहतूक करणाऱ्या वाहनाखाली चिरडून सोमवारी दीड वर्षाची बलिका ठार झाली. हे वाहन मृत बालिकेच्या वडिलांचेच होते, मात्र चालक वेगळा असल्याने त्याच्या दुर्लक्षामुळे मुलीचा जीव गेला. याप्रकरणी त्याच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना वानलेसवाडी येथे दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. स्वराली सचिन आलदर (रा. धनगर गल्ली, वानलेसवाडी) असे मृत बालिकेचे नाव आहे. ज्या वाहनाखाली ती सापडली ते वाहन तिच्या वडिलांचेच आहे, मात्र वडिल क्लिनरच्या बाजुला बसले होते व वाहन सुनील पांडुरंग सरगर (वय २०, रा. लक्ष्मीनगर, जुना बुधगाव रस्ता, सांगली) हा चालवित होता. त्याच्या दुर्लक्षामुळे बालिका वाहनाखाली चिरडली गेली. याबाबत विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वरालीचे वडिल सचिन हे फळविक्रेते आहेत. दुपारी ते त्यांचे वाहन (क्र. एमएच १०, एक्यु ४०५३) घेऊन व्यापार करण्यासाठी निघाले होते. सुनील सरगर हा वाहन चालवित होता, तर आलदर हे शेजारी बसले होते. गाडी मागे घेत असताना चालक सुनीलने मागे कोणी आहे का हे पाहिले नाही. त्याने गाडी जोरात मागे घेतली आणि स्वराली चाकाखाली आली.
विश्रामबाग ठाण्याचे पोलीस नाईक संदीप माने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चालक सुनील सरगरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने स्वरालीच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. वानलेसवाडी परिसरातही या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.