सांगली : सांगलीतीलपूरग्रस्त वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मदतीसाठी चिपळूणचे तरूण धावून आले. काबाडकष्ट करून जगणाऱ्या या तरूणांनी एकत्र केलेली लाखमोलाची मदत वृत्तपत्र विक्रेत्यांना दिलासा देऊन गेली.गोवळकोट, चिपळूण येथे गेली पाच ते सहा वर्षे राजे सामाजिक प्रतिष्ठानतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात.
गडसंवर्धन मोहिमेत या संस्थेचे मोठे योगदान आहे. या संस्थेचा संस्थापक असलेला तरूण सागर आगरे मूळचा सांगलीतील समडोळीचा. आपल्या भागात पूर आला आहे, प्रचंड नुकसान झाले आहे, हे कळताच त्याने गोवळकोटमधील सहकाऱ्यांना सोबत घेऊन मदतीची तयारी सुरू केली. परिपूर्ण कीट तयार केले आणि तडक सांगली गाठली. वृत्तपत्र विक्रेत्यांचे काम, त्यांची समाजाप्रती असणारी तळमळ, याची माहिती मिळताच ही मदत वृत्तपत्र विक्रेत्यांनाच द्यायची, असा निर्धार करून संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सांगलीत येऊन या साहित्याचे वृत्तपत्र विक्रेत्यांना वाटप केले.
यावेळी राजे प्रतिष्ठानचे संस्थापक सागर आगरे, अध्यक्ष विशाल राऊत, उपाध्यक्ष प्रशांत पोतदार, सदस्य अभय जुवले, प्रतीक रेमजे, ओमकार बुरटे, विनायक बुरटे, शुभम टाकले, पार्थिव हरवडे, साईराज विभुते, अनिकेत महाकाल, पंकज आगरे, सौरभ खोपटकर, निखिल खोपटकर उपस्थित होते.कार्यकर्त्यांनी पुराच्या तीव्रतेबाबत अधिक माहिती घेत वृत्तपत्र विक्रेत्यांना आधार दिला. यावेळी सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनचे विकास सूर्यवंशी, मारूती नवलाई, शिवाजी काकडे, विशाल रासनकर, अमोल साबळे उपस्थित होते.